गोमय गणेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नमिता वारणकर

गाईचे शेण… म्हणजेच गोमय… विषमुक्त आणि प्रदूषणमुक्त करणारे… पौरोहित्यासाठी यज्ञ, होमहवन करण्यासाठी शेणापासून तयार केलेल्या गोवऱ्या जाळल्या जातात. त्यातून येणाऱ्या धुरातून हानीकारक जंतू नाहीसे होतात… असे पर्यावरणरक्षक गोमय आता गणेशमूर्तीही बनवण्याकरिता उपयोगात येत आहे. यानिमित्त नागपूरच्या ग्रामायण प्रतिष्ठानचे अनिल सांबरे यांच्याशी साधलेला संवाद…

गोमय गणेशमूर्तीच्या निर्मितीविषयी ते सांगतात, ‘गोमय वसते लक्ष्मी’ म्हणजे शेणामध्ये लक्ष्मीचा वास असतो असे प्रसिद्ध वचन आहे. गोमय हे शेतकऱ्याचं गोधन आहे. त्यातून त्याला पैसे मिळतात. महत्त्वाचे म्हणजे पूर्वीच्या मानाने गणपतीच्या मूर्तींसाठी लागणारी माती आज दुर्मिळ होत आहे. तसेच पर्यावरणाची हानी करणाऱ्या ९० टक्के मूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून तयार केल्या जातात. त्याकरिता शेणापासून तयार केलेल्या सवा ते आठ इंचाच्या छोटय़ा गोमय गणेशमूर्ती आम्ही बनवल्या आहेत.

आज अनेक ठिकाणी गोशाळा आहेत. त्यांचे संवर्धन होणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना आणि गायी पाळणाऱ्यांना या उपक्रमाच्या माध्यमातून आर्थिक समृद्धी लाभेल. त्यासाठी गोमय मूर्तींसह वेगवेगळ्या प्रकारची स्मृतिचिन्हे, कुंडय़ा, पेनस्टॅण्ड, तोरण, रांगोळीची सजावट केलेली चिन्हे अशा कलाकुसरीच्या वस्तूही ग्रामायण या संस्थेतर्फे तयार केल्या जातात. माती आणि लाकडाप्रमाणे शेणापासूनही अनेक प्रकारच्या वस्तू बनवल्या जातात. याबाबत लोकांना जागरुक करण्यासाठी या संस्थेतर्फे कार्यशाळाही घेतल्या जातात. गोमय गणेशमूर्ती बनवण्याची पद्धत लोकांना शिकवणे, त्यासाठीचे कौशल्य आत्मसात करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणे, त्यांचे रंगकाम करणे यासाठी शेतकरी आणि गोशाळा चालकांना प्रवृत्त केले जाते. कारण त्याद्वारे त्यांना चांगला पैसाही मिळू शकतो. त्याबरोबरच शेणापासून मूल्यवर्धित वस्तू बनवण्याचं शिक्षण दिलं जातं. त्यामधून प्रशिक्षणार्थींमध्ये कल्पकता वाढते.

गणेशमूर्तीच्या संकल्पनेविषयी त्यांचे म्हणणे आहे की, मूर्तीच्या मातीसाठी लागणाऱ्या मातीकरिता आम्ही महाराष्ट्रभर सर्वेक्षण केले तेव्हा फक्त ४०० मूर्ती शाडू मातीच्या मिळाल्या. इतर सर्व मूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या होत्या. याचे कारण शेतातील माती ही आता कमी होऊ लागली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील माणसाला पैसा मिळावा यासाठी गोमय गणेशमूर्तींची संकल्पना प्रत्यक्षात साकारायचे आम्ही ठरवले.

गणपतीच्या मूर्तींसाठी लागणारी माती आज दुर्मिळ होत आहे. याकरिता शेणापासून तयार केलेल्या सव्वा ते आठ इंचाच्या छोटय़ा गोमय गणेशमूर्ती बनवल्या आहेत. यामुळे पर्यावरणाचे रक्षण, गोधन वाचवणे, शेतकऱ्याची समृद्धता आणि गोमयाला अपेक्षित मूल्य मिळावे, अशा प्रकारचे अनेक फायदे होतील.

नागरिकांचा प्रतिसाद उत्तम

नागरिकांच्या आवडीप्रमाणे या मूर्तीमध्ये शेण आणि काही प्रमाणात माती मिसळूनही या गणेशमूर्ती तयार केल्या आहेत. मागणीनुसार यामध्ये फळांचं बी टाकलं जातं. घरगुती किंवा इतर झाडांना खत म्हणूनही याचा वापर करता येऊ शकेल. यामुळे पर्यावरणप्रेमी नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. काही लोकं स्वतः मूर्ती तयार करण्याचा आग्रह करतात, कारण इतरांनाही अशी मूर्ती बनवून देण्याचा आनंद त्यांना घेता यावा, अशी माहिती ते देतात.

कुटुंब पर्यावरणाशी जोडलं जातं

गोमय गणेश मूती कुटुंबात जाते तेव्हा मुख्य म्हणजे ते कुटुंब पर्यावरणाच्या दृष्टिने विचार करायला लागतं. हे यातलं महत्त्वाचं साध्य आहे. यामुळे कुटुंबाचं पर्यावरणाशी असलेलं नात वृद्धिंगत व्हायला मदत होते. महत्त्वाचे म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिस पर्यावरण विरोधक आहे. शाडू माती आज मिळत नाही. यासाठी गोमय मूर्तीच्या उपक्रमातून शेतकऱयांना आर्थिक हातभार मिळू शकेल शिवाय या मूर्तींच घरीही सहज विसर्जन करता येऊ शकतं. यामुळे झाडांचंही संवर्धन होईल.

संपर्कासाठी…

मातीच्या मूर्तीप्रमाणेच गोमय मूर्तीचे साचे बनवण्यात आले आहेत. यामुळे कलाकार नसलेली व्यक्तिही मूर्ती तयार करू शकेल आणि रेजगार निर्मितीला हातभार लागेल, या मूर्तींच्या मागणीसाठी ९२२५२१०१३० या क्रमांकावर संपर्क साधावा.

– [email protected]