
गणपती बाप्पाचे आगमन काही दिवसांवरच येऊन ठेपल्याने गावी जाणाऱया चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे. बाप्पाच्या मखरापासून ते गौरीच्या शृंगारापर्यंत, पुजेच्या सामानापासून ते शिध्यापर्यंत आपल्या बालकबिल्यांसह गावी दाखल होण्यासाठी तिकिटे बुक झाली असून उद्या-परवापासून प्रवासालाही सुरुवात होईल. खासगी वाहनांसोबत टॅव्हल कंपन्यांच्या बसेसची गर्दीही यावेळी वाढणार असल्याने गणपतीला गावी जाणाऱया चाकरमान्यांचा प्रवास निर्विघ्न पार पडावा यासाठी रायगड पोलिसांनी टाइट सिक्युरिटी लावली आहे.
रायगड हद्दीतील मुंबई-गोवा महामार्गावर चोख वाहतूक बंदोबस्त 28 ऑगस्टपासून तैनात करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर व अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली 6 उपविभागीय पोलीस अधिकारी, 13 पोलीस निरीक्षक, 20 सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षकांसह 384 पोलीस आणि 100 स्वयंसेवकांचा फौजफाटा महामार्गावर तैनात राहणार आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर पेण पोलीस चौकी, वडखळ, नागोठणे वाकण फाटा, पाली फाटा, कोलाड, इंदापूर, माणगाव, नागली फाटा, महाड-पोलादपूर या ठिकाणी 14 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या गर्दीच्या ठिकाणी बॅरीकेडिंग लावण्यात आली असून गणेशभक्तांचा मार्ग सुकर व्हावा यासाठी ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आले असल्याची माहिती जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश कराडे यांनी दिली.

























































