सातासमुद्रापार घुमला मोरयाचा गजर; लंडनमधील हौन्सलो गणेशोत्सव मंडळाचा गणेशोत्सव दणक्यात

ढोल-ताशाचा गजर, हातात भगवे झेंडे घेऊन पारंपरिक वेशभूषेत लेझीमच्या तालावर थिरकणारे आबालवृद्ध, भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल अशा मोठय़ा उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात लंडनमधील हौन्सलो गणेशोत्सव मंडळातर्फे दीड दिवसाचा गणेशोत्सव दणक्यात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ अशा गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

विघ्नहर्ता गणरायाच्या आगमनामुळे सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. अगदी सातासमुद्रापारदेखील गणरायाच्या आगमनाचा जल्लोष पाहायला मिळतोय. लंडनमधील हौन्सलो गणेशोत्सव मंडळातर्फे गेल्या 17 वर्षांपासून गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा करण्यात येत आहे. मूळचे बोरिवलीकर असलेले आणि सध्या लंडनमध्ये स्थायिक असलेल्या वैभव रावराणे यांनी 2008 साली या मंडळाची स्थापना केली. मुंबईच्या उत्सवाची धम्माल लोकांना लंडनमध्ये अनुभवायला मिळावी आणि यानिमित्ताने सर्वांनी एकत्र यावे ही यामागची संकल्पना होती. विशेष म्हणजे कांदिवलीतील श्री आर्ट येथून बाप्पाची मूर्ती येथे आणली जाते. यंदाही मंडळातर्फे जल्लोषात उत्सव साजरा करण्यात आला. केवळ हिंदूच नव्हे तर सर्वधर्मीय तसेच लंडनमधील गोरेदेखील या उत्सवात सहभागी झाले होते.

हा उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी मंडळाचे  सोनाली बोरकर, मोनाली मोहिते, महेश शेट्टी, सुजय सोहनी, नितीन पार्ते, सूरज लोखंडे या सदस्यांनी मेहनत घेतली. विशेष म्हणजे यंदा पहिल्यांदाच मंडळाने स्वतःचे लेझीम पथक तयार केले असून यात 6 ते 55 या वयोगटातील लहान मुले-मुली आणि महिलांचा सहभाग आहे.

वाजतगाजत बाप्पाला निरोप

दुसऱ्या दिवशी ढोल-ताशांचा गजर आणि लेझीमच्या तालावर बाप्पाची भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषेत शेकडो गणेशभक्त विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते. या वेळी बर्मिंगहॅमच्या ढोल ड्रम्स ग्रुपच्या सादरीकरणाने सगळय़ांचे लक्ष वेधले. त्यानंतर थेम्स नदीत बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.

सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

गणेशोत्सवात मंडळाने आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनादेखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चित्रकला स्पर्धा, बेस्ट फ्रॉम वेस्ट, पाककला स्पर्धा (मोदक आणि खीर बनविणे), रांगोळी, फॅन्सी ड्रेस आणि  हौन्सलो गॉट टॅलेंट अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. महिलांसाठी ‘उखाणा तुला कळला ना…’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या महिलेला 50 हजार रुपयांची डायमंड इयररिंग बक्षीस म्हणून देण्यात आली.