गिरगावच्या मुगभाट परिसरातील माधवदास प्रेमजी चाळ म्हणजे आताची माधवदास प्रेमजी गृहनिर्माण संस्थेच्या श्रीगणरायाचे यंदा शताब्दी वर्ष आहे. 1924 साली माधवदास प्रेमजी चाळ गणेशोत्सवाचा शुभारंभ झाला. गणेशोत्सवात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याची परंपरा आजही कायम आहे.
यंदा दहा दिवसांच्या उत्सवात ‘डबेवाल्यांचे व्यवस्थापन’ या विषयावर सुभाष तळेकर माहिती देतील. तसेच 70-90 च्या दशकातील गाण्यांचा कार्यक्रम, मराठी कलाकारांची स्टॅण्डअप कॉमेडी, महिलांच्या आयुष्यावर ‘ती’ची कहाणी आदी कार्यक्रम सादर होतील. तसेच शनिवारी गणेशयाग, रविवारी सहस्रावर्तन होईल. अनंत चतुर्दशीच्या पहाटे काकड आरती होईल. माधवदास प्रेमजी चाळीच्या गणेशोत्सवाचे वैशिष्टय़ म्हणजे मागील 100 वर्षे एकाच कारखान्यातून मूर्ती घडवली जाते, अशी माहिती चाळीतील जुने रहिवासी माधव दामले यांनी दिली.
माधवदास प्रेमजी चाळीतील गणेशोत्सवाचे 1975 साली सुवर्ण महोत्सव तर 1984 साली हिरक महोत्सवी वर्ष होते. 1999 साली अमृत महोत्सव साजरा झाला. यानिमित्त अनेक दिग्गजांचे कार्यक्रम सादर झाले होते. सुलोचना चव्हाण, पं. शंकर अभ्यंकर, पंडित सुरेश तळवलकर, यशवंत देव, पंडित जितेंद्र अभिषेकी, व. पु., प्रभाकर पणशीकर, श्रीधर फडके, सुरेश खरे, भक्ती बर्वे आदी दिग्गजांचे पाय या वास्तूला लागले.