
बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस उरले आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पुढाकाराने पालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनांबाबत तातडीने कार्यवाही करून गणेशोत्सवाचे योग्य नियोजन करावे, अशा सूचना देण्यात आल्या.
शिवडी विधानसभा क्षेत्रातील मुंबईमधील नामांकित गणपती मंडळांच्या विविध समस्या व सूचनांकरिता आमदार अजय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. महापालिका उपायुक्त प्रशांत सपकाळे, सहाय्यक आयुक्त महेश पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त घनश्याम पलंगे व इतर महापालिका अधिकारी, पोलीस अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनांबाबत तातडीने कार्यवाही करून गणेशोत्सवाचे योग्य नियोजन करावे, अशा सूचना दिल्या. मुंबईचा राजा, परळचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, शिवडीचा राजा व इतर गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.