
मुंबई शहर व उपनगरांसह ठाणे, नवी मुंबईतून हजारो गणेशभक्त शुक्रवारी रेल्वेच्या नियमित व जादा गाड्या तसेच एसटीच्या गौरी-गणपती विशेष गाड्यांतून कोकणात रवाना झाले. मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे या प्रमुख स्थानकांच्या प्लॅटफॉर्मवर गणेशभक्तांच्या लांबलचक रांगा लागण्यास सुरुवात झाली. तसेच एसटी आगारांमध्येदेखील प्रचंड गर्दी झाली.
रेल्वेने यंदा 380 गणपती विशेष गाड्यांची व्यवस्था केली आहे. तसेच एसटीच्या पाच हजार जादा गाड्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिह्यात धावणार आहेत. जादा गाड्यांनी शुक्रवारपासून कोकणची वाट धरल्याने मध्य रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवर आणि एसटीच्या मुंबई सेंट्रल, परळ, नॅन्सी कॉलनी, कुर्ला, ठाणे आदी बसस्थानकांवर गणेशभक्तांनी गर्दी केली. रेल्वे स्थानकावर जीआरपी आणि आरपीएफचे अतिरिक्त जवान तैनात केले आहेत.
महामार्गांवर लक्झरी गाड्यांचा धंदा तेजीत
रेल्वे, एसटीच्या गाड्यांबरोबर खासगी गाड्यांतून गाव गाठणाऱ्या प्रवाशांची संख्या खूप आहे. त्या प्रवाशांमुळे लक्झरी गाड्यांचा धंदा तेजीत आहे. शुक्रवारी पश्चिम आणि पूर्व महामार्गावर ठिकठिकाणी लक्झरी गाड्यांमधून गावी जाण्यासाठी गणेशभक्तांनी गर्दी केली होती.
तीन दिवसांत तीन हजार एसटी गावी जाणार
एसटी महामंडळाच्या जादा गाड्यांची वाहतूक शुक्रवारपासून सुरू झाली. रविवारपर्यंत एसटीच्या तीन हजारांहून अधिक जादा गाड्या कोकणात जाणार आहेत, अशी माहिती महामंडळाच्या वाहतूक विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. परळ, बोरिवली, कुर्ला आणि ठाणे बस स्थानकातून सुटणाऱ्या बसचे प्रमाण अधिक आहे.































































