
अल्पवयीन मुलाचा खून करून लातूरला जाण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे. पुणे शहरातील पर्वती पायथा परिसरात अल्पवयीनाचा खून केल्यानंतर टोळीने किरकिटवाडीहून भोर गाठले. त्यानंतर तेथून लातूरला जाण्याच्या तयारीत असलेल्या टोळीच्या दत्तवाडी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. सौरभ विनोद वीर उर्फ मोन्या, अक्षय विनोद वीर, वृषभ दत्तात्रय रेणुसे, सचिन उर्फ दादा पवार, आकाश नावाडे, स्वामी कांबळे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सौरभ वाघमारे (रा. जनता वसाहत) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.
आरोपी वृषभ रेणुसे याचा भाचा संग्राम लेकावळेचा सौरभ वाघमारे याने एप्रिलमध्ये खून केला होता. त्याचा राग मनात धरून आरोपींनी सौरभला मारण्याचा कट रचला. त्यानुसार आरोपींना रविवारी रात्री सौरभला जुना मोबाईल देण्याचा बहाणा करून पर्वती पायथा येथे बोलावून घेत त्याच्या डोक्यात, पाठीवर व हातावर कोयत्याने वार करून त्याचा खून केला. त्यानंतर आरोपी किरकीटवाडीहून भोरला दुधवाहतूकीच्या वाहनातून गेले. तेथून ते लातूरला जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती सुधीर घोटकुले, सागर सुतकर, शिवाजी क्षीरसागर यांना मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार पथकाने सापळा रचून आरोपींनी ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर, पोलीस निरीक्षक विजय खोमणे, तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, कुंदन शिंदे, राजू जाधव, शरद राऊत, महेश गाढवे, अमित सुर्वे, सागर सुतकर, प्रमोद भोसले, विष्णू सुतार, अक्षयकुमार वाबळे, राहूल ओलेकर, नवनाथ भोसले यांच्या पथकाने केली.


























































