कोपरगावात दानपेट्या फोडणारी टोळी गजाआड; तीन मंदीरातील चोऱ्या उघडकीस

कोपरगाव तालुक्यातील विविध ठिकाणच्या मंदिरातील दानपेट्या फोडणारी टोळी येथील तालुका पोलीस पथकाने नुकतीच गजाआड केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोळपेवाडी येथील महेश्वर मंदिर, तळेगाव मळे येथील शनैश्वर मंदिर व मायगाव देवी येथील रेणुका माता मंदिरातील दानपेट्या काही दिवसांपूर्वी चोरट्यांनी फोडून आतील रोख रक्कम चोरून नेली होती. या चोरींबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रकाश काळे (वय 25, रा. भोजडे) या चोरट्याचा शोध कोपरगाव पोलीस ठाण्यातील पोलीस घेत होते. स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीवरून राहुल केवलसिंग आणि धनंजय लोदवाल (वय 32, रा. बेलापूर, ता.श्रीरामपूर) यांना पोलिसांनी अटक केली. आरोपींनी कोळपेवाडी येथील महेश्वर मंदिरातून चोरलेली 7 हजार 500 रूपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. त्याशिवाय तळेगाव तळे व मायगाव देवी येथील मंदिरातून चोरलेले 19 हजार 500 रूपये त्यांच्याकडून जप्त करण्यात आले आहेत.

ही कारवाई पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, सहाय्यक फौजदार सुरेश गागरे, पो.हे. कॉ. संदीप बोटे, पो. ना. संतोष लांडे, पो. कॉ. अनिश शेख, पो. कॉ. अंबादास वाघ, पो. कॉ. राघव कोतकर, पो. कॉ. रमेश झडे, पो. कॉ. अमोल फटांगरे, चालक पो. ना. रामा साळुंके यांच्या पथकाने केली आहे.