
रात्रीच्या वेळेस मार्पेट परिसरात शिताफीने दुकान फोडून लाखो रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या दुकलीला एल. टी. मार्ग पोलिसांनी जेरबंद केले आहे. या आरोपींविरोधात विविध पोलीस ठाण्यांत अनेक गुह्यांची नोंद आहेत.
शिवडी येथे राहणारे दिनेश गुंदेशा यांचे बाबू गेनू मार्गावरील ओम शांती को-ऑप. सोसायटीत दुकान आहे. 31 ऑगस्टच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून सहा लाख 90 हजार घेऊन पोबारा केला होता. हा प्रकार लक्षात येताच गुंदेशा यांनी तक्रार दिल्यावर एल. टी. मार्ग पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा नोंदविण्यात आला. वरिष्ठ निरीक्षक नितीन तडाखे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रशांत कांबळे तसेच कुंभार, परुळेकर, पाटील, राऊत, साटम, सातपुते, लोंढे आणि जोशी या पथकाने तांत्रिक बाबी व मानवी कौशल्याच्या आधारे पालघरच्या पेल्हार येथे राहणारा हुसेन मोहम्मद रफिक शेख आणि मानखुर्द येथे राहणारा सय्यद अहमद मस्तान शेख या दोघांना ताब्यात घेतले.