
गोवा आणि दमण येथून आणलेले तसेच महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेले विदेशी मद्य महाराष्ट्र राज्याच्या लेबल असलेल्या दारूच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये भरणाऱ्या तालुक्यातील रायतेवाडी येथील एका कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकून हा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. या कारवाईत गोवा आणि दमणच्या दारूच्या बाटल्या तसेच हुंडाई कंपनीचे एक वाहन असा एकूण 14 लाख 28 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
सुरेश मनोजकुमार कालडा (रा. जाणता राजा मैदानाजवळ, संगमनेर), चैतन्य सुभाष मंडलिक (रा. रायतेवाडी, ता. संगमनेर) अशी अटक केलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत.
संगमनेर तालुक्यातील रायतेवाडी शिवारात एका ढाब्याच्या मागे शेतामध्ये असलेल्या एका घरात गोवा व दमण राज्यांतून आणलेले तसेच महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेले विदेशी मध्य महाराष्ट्रात उत्पादित होणाऱ्या मद्याच्या रिकाम्या दारूच्या बाटल्यांमध्ये भरले जात होते. तसेच या बाटल्यांवर नामांकित कंपन्यांची बुचे बसवली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.
पथकाने महाराष्ट्रातील बाटल्यांवर लावण्यासाठी आणलेली विविध ब्रँडची बनावट नकली बुचे व गोवा आणि दमण येथून आणलेल्या दारूच्या बाटल्या तसेच एक हुंडाई कंपनीचे वाहन असा एकूण 14 लाख 28 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी सुरेश मनोजकुमार कालडा व चैतन्य सुभाष मंडलिक या दोघांना अटक केली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संगमनेर विभागाचे निरीक्षक आर. डी. वाजे, दुय्यम निरीक्षक सूर्यवंशी, निरीक्षक एस. आर. वाघ, एच. डी. गुंजाळ, एस. आर. वराट, निरीक्षक अनिल पाटील जमादार भोर आदींनी कारवाई केली आहे.





























































