गँगस्टर छोटा राजनचा गुंड व अन्य दोघांना शस्त्रांसह पकडले

मुंबई गुन्हे शाखेच्या युनीट-3ने सलग दोन दिवस चांगली कामगिरी केली. आधी गँगस्टर छोटा राजनच्या गुंडाला देशी पिस्तूल व जिवंत काडतुसांसह पकडल्यानंतर या पथकाने अन्य एका अभिलेखावरील आरोपीला देशी बनावटीच्या रिव्हॉल्व्हर व दोन जिवंत काडतुसांसह रंगेहाथ पकडले. याशिवाय युनीट-9चे वरिष्ठ निरीक्षक दया नायक व त्यांच्या पथकाने अन्य एकाला दोन देशी बनावटीच्या पिस्तूल व दहा जिवंत काडतुसांसह पकडले आहे.

मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक परिसरात एक व्यक्ती शस्त्रांस्त्रs घेऊन येणार असल्याची खबर युनीट-3ला मिळाली. त्यानुसार प्रभारी निरीक्षक दीपक सुर्वे, निरीक्षक शामराव पाटील, सपोनि समीर मुजावर व पथकाने सापळा रचून एका संशयीताला उचलले. त्याची अंगझडती घेतली असता त्या व्यक्तीजवळ एक देशी बनावटीचे रिव्हॉल्वर आणि दोन जिवंत काडतुसे मिळाली. फारूख शेख (45) असे त्या शस्त्र घेऊन आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.दोन दिवसांपूर्वी युनीट-3ने गँगस्टर छोटा राजनचा गुंड शाम तांबे उर्फ सॅव्हिओ रॉड्रिक्स याला एक देशी बनावटीचे पिस्तूल व तीन जिवंत काडतुसांसह रंगेहाथ पकडले होते.

दया नायक व पथकाकडून एकाला अटक

युनीट-9चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक व त्यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे सांताक्रुझ येथील सोमपुरी मार्पेट परिसरात शस्त्र घेऊन आलेल्या विजय मेघानी याला पकडले. अंगझडतीत देशी बनावटीची दोन पिस्तुले आणि दहा जिवंत काडतुसे मिळाली. विजयविरोधात तुंळीज पोलीस ठाण्यात एक गुन्हा तसेच वालीव पोलीस ठाण्यात एका अदखलपात्र गुह्याची नोंद आहे.