गणपत गायकवाड यांच्यासह आठ जणांवर अॅट्रॉसिटी

जमिनीच्या वादातून भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी हिललाईन पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा मिंधे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर तुफान गोळीबार केला. मिंधे आणि भाजपमध्ये रक्तरंजित गँगवॉर उसळला असतानाच गणपत गायकवाड यांच्यासह आठ जणांवर आज अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवघ्या दहा सेकंदांत घडलेल्या फिल्मीस्टाईल नाटय़ानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली असून मिंधे व भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. दरम्यान ज्या कळवा पोलीस ठाण्याच्या कस्टडीत गायकवाड यांना ठेवले आहे त्या परिसरास पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. पोलिसांनी त्यांची 30 तास कसून चौकशी केली असून त्याबाबत एकही अधिकारी बोलण्यास तयार नाही.

द्वारली येथील जमिनीचा वाद हिललाईन पोलीस ठाण्यात गेला होता. मात्र मांडवली न झाल्याने आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या केबिनमध्येच केवळ तीन फुटांवरून मिंधे गटाचे महेश गायकवाड यांच्यावर बेछूट गोळीबार केला. त्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही थरारक घटना घडल्यानंतर गणपत गायकवाड यांच्यासह हर्षल केणे व संदीप सरवणकर यांना त्वरित अटक करण्यात आली. ज्या पोलीस ठाण्यात गोळीबाराची घटना घडली त्याच पोलीस ठाण्यात आज गायकवाड यांच्यासह जितेंद्र पारिक, विठ्ठल चिकणकर, शिवाजी फुलोरे, सौरभ सिंग, छोटू खान, चंद्रकांत ओल, मंगेश वारघेट यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

द्वारली येथे राहणाऱया मधुमती ऊर्फ नीता जाधव यांनी आज पोलीस ठाण्यात जाऊन आमदार गणपत गायकवाड यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. जाधव यांचे सासरे नामदेव जाधव यांच्या नावावर सर्व्हे नं. 6 ही जमीन असून त्याबाबत गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू आहे. या जागेवर बांधकामांचे साहित्यदेखील आणून ठेवले आहे. त्यांच्या कुटुंबाने थेट महसूल मंत्रालयाकडे अपिल केले असून त्याचा अद्यापि निकाल लागलेला नाही. तरीदेखील गणपत गायकवाड व त्यांचे साथीदार यांनी 31 जानेवारी रोजी द्वारली येथे जाऊन जमीनमालकांना दमदाटी केली. एवढेच नव्हे तर फावडे हातात घेऊन हल्ला करण्याचाही प्रयत्न केला. यावेळी गायकवाड यांनी जातीवाचक वक्तव्ये करून धमकी दिल्याचा आरोप फिर्यादी मधुमती जाधव यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.

भाजप कार्यकर्त्यांवर कारवाई
गणपत गायकवाड यांना अटक केल्यानंतर शनिवारी त्यांना उल्हासनगरच्या चोपडा न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी न्यायालयाबाहेर त्यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. या घोषणा देणाऱया गुड्डू खान, मोना शेठ, नीलेश बोबडे, शीला राज, सूरज खान, अंजली खामकर, विद्या त्रिंबके, भावेश टोल, सरिता जाधव आदींसह असंख्य कार्यकर्त्यांवर कारवाई करत गुन्हे दाखल केले आहेत.

कल्याण पूर्वेत मोठा बंदोबस्त
गोळीबाराच्या घटनेनंतर कल्याण पूर्व भागात तिसगाव नाका येथे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. केवळ 100 मीटर अंतरावर आमदार गणपत गायकवाड व मिंधे गटाचे महेश गायकवाड यांची कार्यालये असून तेथेही पोलीस तैनात करण्यात आले आहे. बीट मार्शल, दंगल नियंत्रण पथक व ठिकठिकाणी उभ्या असलेल्या पोलिसांच्या गाडय़ा यामुळे संपूर्ण कल्याण पूर्वेचा भाग भीतीच्या सावटाखाली असल्याचे दिसत आहे.

सात जणांचे पथक
पोलीस ठाण्यात गोळीबाराची घटना घडल्यानंतर गणपत गायकवाड यांचे काही साथीदार फरार झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी सात जणांचे पथक तयार केले आहे. तर या संपूर्ण प्रकरणाच्या तपासासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त नीलेश सोनवणे यांची नियुक्ती केली असून तपासाचा दैनंदिन अहवाल गृहमंत्रालयाकडे पाठवण्यात येत आहे.

गोळीबाराच्या व्हिडीओनंतर केबिनबाहेरील फुटेजही व्हायरल; मिंध्यांच्या हुल्लडबाजांची गायकवाडांच्या मुलाला धक्काबुक्की
हिललाईन पोलीस ठाण्यात जमिनीच्या वादावरून भाजपचे आमदार गणपत गायकवाड आणि मिंधे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड हे दोघेही वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या केबिनमध्ये सेटलमेंटसाठी आले होते. त्यांच्यासोबत गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड तसेच अन्य साथीदार होते. काही वेळानंतर वैभव केबिनच्या बाहेर पडला त्यावेळी मिंध्यांच्या हुल्लडबाजांनी त्याला डिवचले. त्यावरून दोन्ही गटांत प्रचंड बाचाबाची तसेच धक्काबुक्कीही झाली. पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना बाजूला केले. हा संपूर्ण प्रकार केबिनमध्ये बसलेले आमदार गणपत गायकवाड व महेश गायकवाड हे दोघेही पाहात होते. आपल्या मुलाला धक्काबुक्की सुरू झाल्याचे पाहून संतापलेल्या गणपत गायकवाड यांनी थेट पिस्तूल काढून महेश गायकवाड यांच्यावर गोळय़ा झाडल्या. त्यात महेश गायकवाड हे गंभीर जखमी झाले. केबिनमधील या थरारक प्रसंगाचे सीसीटीव्ही फुटेज लगेच व्हायरल झाले होते. त्यास 30 तास उलटत नाही तोच आज केबिनच्या बाहेर घडलेल्या घटनेचेदेखील सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासाला आता कोणती दिशा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

30 तास कसून चौकशी, ‘त्या’ सीसीटीव्हीची चौकशी सुरू
हिललाईन पोलीस ठाण्यात गोळीबाराची भयानक घटना घडल्यानंतर त्याचे सीसीटीव्ही फुटेज काही तासांतच सोशल मीडियामध्ये व अन्यत्र व्हायरल झाले. हे फुटेज कसे बाहेर पडले याबाबत सर्वत्र टीकेची झोड उठताच त्याची गंभीर दखल गृह खात्याने घेतली असून वरिष्ठ पातळीवरून चौकशी सुरू झाली आहे.

महेश गायकवाड व्हेंटिलेटरवर
गोळीबारात गंभीर जखमी झालेले महेश गायकवाड हे अजूनही व्हेंटिलेटरवर असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली आहे. त्यांची प्रकृती नाजूक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान आज ठाण्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी ज्युपिटर रुग्णालयात जाऊन गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.