नागपूरमध्ये आता चालते फिरते गॅरेज

14

सामना ऑनलाईन । नागपूर

आज पर्यंत तुम्ही टोल फ्री क्रमांकावर तत्काळ सेवा देणारी रुग्णवाहिका पहिली असेल. बदलत्या काळात आता आर.एस.ए ऑटोकेअर प्रा. ली. म्हणजेच Road Side Assistance या संस्थेने प्रथमच चालते फिरते गॅरेज ही संकल्पना आणली आहे. ‘ऑटो आय केअर’ ‘गॅरेज ऑन विल’ असे याचे नाव आहे. आपण खूप हौशीने गाडी घेतो पण ती गाडी कधी व कुठे बंद पडेल हे सांगता येत नाही. या समस्येवर उपाय मुंबई मधल्या एका मराठमोळ्या तरुणाने शोधला आहे. ती व्यक्ती म्हणजे सागर जोशी. आता तुमची गाडी बंद पडल्यावर तुम्हाला गॅरेजमध्ये जाण्याची गरज नाही तर गॅरेजच तुमच्या मदतीला येईल. महाराष्ट्रामध्ये कुठेही तुम्हाला या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. ही सुविधा मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त १८००१२०१२०३ या टोलफी नंबर वर फोन करायचा आहे.

सागर स्वत: ऑटोमोबाईल इंजिनीअर आहेत. स्व:अनुभवावरून ऑटोमोबाईल क्षेत्रात आपण असे काही तरी करायला हवे जेणे करून त्याचा फायदा सामान्य जनतेला होईल असे त्यांना वाटत होते. या कल्पनेमधूनच या उपक्रमाचा जन्म झाला आहे. आर.एस.ए ऑटोकेअर ने भारतामध्ये १८००० गॅरेजस सोबत संपर्क साधला आहे. त्याचा फायदा दुर्लक्षित अशा गॅरेजवर्गाला झाला आहे . तो वर्ग प्रकाश झोतात आला. या कंपनीने सामान्य माणसांना रोजगाराच्या नव-नवीन संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. गाडी बिघडलेल्या व्यक्तीची फसवणूक होऊ नये व अतिशय माफक दरामध्ये त्यांना सेवा मिळाव्यात यासाठी ते कार्यरत आहेत. नागपूर मध्ये आता एस डी कारच्या सहकार्याने ‘चालते फिरते गॅरेज’ चा अनुभव नागपूरकरांना अनुभवता येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या