
सामना ऑनलाईन, मुंबई
बोरिवली, कांदिवलीतील कचरा उचलणाऱ्या कामगारांनी गेल्या तीन दिवसांपासून पुकारलेले आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे. या कामगारांना पाठिंबा देण्यासाठी सर्व 24 प्रभागांतील कचरागाडय़ांवरील पालिकेचे कामगार सहभागी होणार आहेत. त्यामुळे उद्या संपूर्ण मुंबईतच कचराकोंडी होण्याची शक्यता आहे.
पालिका प्रशासनाने परिमंडळ-7 मध्ये कचरा उचलण्यासाठी नव्याने कंत्राट दिले आहे. या अंतर्गत कंत्राटदारानेच रस्त्यावरचा कचरा उचलून तो क्षेपणभूमीपर्यंत नेण्याचे काम करायचे आहे. प्रायोगिक तत्त्वावर आर उत्तर, आर मध्य, आर दक्षिण या विभागांत अर्थात बोरिवली, दहिसर येथे याच पद्धतीने कचरा उचलण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या पद्धतीने कचरागाडय़ांवर काम करण्यासाठी कंत्राटदारांचेच कंत्राटी कामगार नेमण्यात येणार आहेत. त्यामुळे गेल्या 10-12 वर्षांपासून नियमित आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार आहे. यामध्ये ‘कायम’ कर्मचाऱ्यांचे इतर ठिकाणी समायोजन करण्यात येणार असले तरी हंगामी कर्मचाऱ्यांचे काय होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या सर्व कामगारांनी बोरिवली, दहिसरमध्ये कचरा उचलण्याचे काम थांबवले आहे. याशिवाय आझाद मैदानात धरणे आंदोलनही करण्यात आले. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनावर प्रशासनाने तोडगा न काढल्याने उद्या शुक्रवारपासून सर्व प्रभागांत काम बंद करण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.
रिक्त पदे भरायची नाहीत
झाडू खात्यात हजारो रिक्त जागा आहेत त्या प्रशासनाला भरायच्या नाहीत. त्यामुळे अशा पद्धतीने कंत्राटदाराला आणायचा हा डाव आहे. स्थायी समितीमध्ये हे प्रस्ताव येतात तेव्हा कामगारांना त्रास दिला जाणार नाही असे आश्वासन दिले जातात, मात्र प्रत्यक्षात कामगारांची अजिबात कदर केली जात नाही.
सर्व 24 विभागांत कचराकोंडी
दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन सुरू असून प्रशासनाने कामगारांशी आणि कामगार संघटनांशी साधी चर्चाही केली नाही. त्यामुळे आज कामगारांच्या समन्वय समितीने आज बैठक घेऊन आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कामगार सेनेचे बाबा कदम यांनी दिली. सर्व 24 विभागांतील मोटार लोडर चौक्या व घनकचरा व्यवस्थापन परिवहन खाते संपूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
24 प्रभागांतील कचरागाडय़ांवर काम करणारे लोडर, ड्रायव्हर असे सगळे कर्मचारी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती समन्वय समितीचे संजय वाघ यांनी दिली. त्यामुळे आतापर्यंत बोरिवली, दहिसरमध्ये झालेली कचराकोंडी संपूर्ण मुंबईत उग्र रूप धारण करण्याची शक्यता आहे.





























































