उरणचे रस्ते बनले ‘डंपिंग ग्राउंड’; ग्रामपंचायतींचा कचरा रस्त्यावर

487

ग्राम स्वच्छता अभियान देशभरात सुरू असतानाच उरण तालुक्यातील ग्रामपंचायतींनी स्वच्छता अभियानाचे तीनतेरा वाजवल्याचे चित्र दिसत आहे. स्वच्छतेच्या नावाने गावातून गोळा केलेला कचरा रहदारीच्या रस्त्यांवर टाकून या ग्रामपंचायतींनी रस्त्यांचे डंपिंग ग्राउंड केल्याचे चित्र उरण तालुक्यात दिसून येत आहे.

निसर्गसंपन्न डोंगर रांगांनी सजलेला उरणचा पूर्व विभाग उरणचा श्वास म्हणून ओळखला जातो. मात्र, या विभागात असणाऱ्या कोप्रोली,कळंबुसरे,खोपटे या ग्रामपंचायतींच्या हद्दीतील कचरा रहदारीच्या रस्त्यांवर टाकला जात असल्याने सध्या जनतेचा श्वास कोंडला गेला आहे. ग्राम स्वच्छता करताना गोळा केलेला कचरा या ग्रामपंचायतींचे कर्मचारी रस्त्यांच्या बाजूला टाकून देत असल्याने या कचऱ्याच्या दुर्गंधीने रस्त्यावरून जनतेला नाक मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. सध्या शेकडो टन कचरा चिरनेर-कोप्रोली मार्गावर कुजला असल्याने या दुर्गंधीने साथीचे रोग पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. कोप्रोली गावात शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र असूनही या गावातील ग्रामपंचायत प्रशासन जनतेच्या आरोग्याशी खेळत आहे. कलंबुसरे ग्रामपंचायतीने तर गावशेजारी, रस्त्यालगत असणाऱ्या लहानमुलांच्या स्मशानभूमीलाच कचऱ्याचे डंपिंग ग्राउंड बनविले आहे. त्यामुळे एखादे लहान मूल मृत झाले तर त्याचे दफन कुठे करावे हा प्रश्न जनतेला पडला आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याला याबाबत विचारणा केली असता आम्ही त्यांच्यावर कारवाई कशी करणार असा प्रतिप्रश्न विभागाचे उपअभियंता अमोल वळवी यांनी उपस्थित केला. ग्रामस्वच्छतेसाठी आग्रही असणारे पंचायत समिती प्रशासनसुद्धा ग्रामपंचायतींच्या या अस्वच्छ कारभाराला प्रतिबंध करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. एकंदरीत या ग्रामपंचायती ग्रामस्वच्छतेला हरताळ फासत असल्याने जनतेत संताप व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या