
सामना प्रतिनिधी । मालवण
मालवण शहरात गेले काही महीने घंटागाड़ी बंद झाल्याने कचरा प्रश्न निर्माण झाला होता. कचराकुंड्यांमध्ये साचलेला कचरा मोकाट जनावरे आणि कुत्र्यांकडून रस्त्यावर आणून अस्वच्छता निर्माण होत होती. यामुळे नागरिकांकडून प्रश्न उपस्थित होत होते. पालिकेकडून अखेर नव्याने घंटागाड्या खरेदी झाल्याने अनेक महीन्यांची कचरा समस्या सुटली आहे. पाच घंटागाड्या नव्याने सुरू झाल्या आहेत. आता शहरातील प्रत्येक वॉर्डात घंटागाड्यां कचरा गोळा करत फिरणार आहेत. याचा शुभारंभ नुकताच नगराध्यक्ष महेश कांदळगावकर व नगरसेवकांच्या उपस्थितीत करण्यात आला.
केंद्र शासनाने २०१६ मध्ये स्वच्छ भारत अभियान जाहीर केले. संपूर्ण भारत स्वच्छ करण्याच्या महत्त्वाकांक्षी अभियानाचा चौथा टप्पा स्वच्छता सर्वेक्षण २०१९ या नावाने येत्या २ ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. त्यात हागणदारी मुक्ती बरोबरच ओला व सुका कचरा नागरिकांकडून वेगळा गोळा करून त्यावर प्रक्रिया करणे तसेच लोकसहभागातून शहर स्वच्छ करणे या तीन प्रमुख मुद्यांवर भर दिला जात आहे. मालवण नगरपालिकेला गतवर्षी मिळालेल्या बक्षिसामुळे यावर्षीही जोमाने या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पाच घंटागाड्या खरेदी करण्यात आल्या आहेत.
पालिकेकडे चार रिक्षा टेम्पो उपलब्ध असून नव्याने पाच गाड्या आल्याने ९ गाड्यांच्या सहाय्याने शहरातील कचरा स्वच्छतेच्या प्रश्नावर पूर्णविराम मिळणार आहे, असा विश्वास नगराध्यक्ष महेश कांदळगावकर व आरोग्य सभापती आप्पा लुडबे यांनी व्यक्त केला.
प्रत्येक प्रभागात घंटागाडी
पालिकेतील सर्व नगरसेवकांनी याहीवर्षी स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सहभागी होण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे. या दृष्टीनेही घंटागाड्या खरेदी करण्यातही आल्या आहेत. यातील सर्व गाड्या पालिकेकडे उपलब्ध झाल्या. यात प्रत्येक प्रभागात एक याप्रमाणे आठ प्रभागात घंटागाड्या सुरू राहतील व एक घंटागाडी राखीव ठेवण्यात येणार आहे. सर्व गाड्यांसाठी कंत्राटी चालक घेऊन गाड्या संपूर्ण शहरात फिरविण्यात येणार आहेत.
४० मजूर घेण्याचीही कार्यवाही पूर्ण
पालिकेकडून ४० मजूर घेण्याचीही कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. प्रत्येक वॉर्डमध्ये दोन कामगार कार्यरत राहणार आहेत. उर्वरित सहा मजूर आडारी डंपिंग ग्राऊंड येथे वर्गीकरणाचे काम करणार आहेत. याठिकाणी गांडूळ खत व बायोगॅस प्रकल्पाचेही काम जोमाने करण्यात येणार आहे. आरोग्य विभागाकडून नियोजन करण्यात येणार आहे. कचरा कुंड्यांमध्ये प्रत्येक घराचा व थेट घंटागाड्यांमध्ये येण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
































































