
ICC T20 World Cup 2026 मधील निराशाजनक कामगिरीनंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने (SLC) मोठा निर्णय घेतला आहे. सनथ जयसूर्या यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी आता दक्षिण आफ्रिकेचे दिग्गज गॅरी कर्स्टन यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
टी-२० विश्वचषकात श्रीलंकेचा प्रवास संमिश्र राहिला. संघाने साखळी फेरीत चांगली कामगिरी करत ‘सुपर-८’ मध्ये प्रवेश मिळवला होता. मात्र, सुपर-८ च्या फेरीत संघाला एकाही सामन्यात विजय मिळवता आला नाही. या खराब कामगिरीमुळे श्रीलंकेचे उपांत्य फेरीचे स्वप्न भंगले, ज्याचे पडसाद उमटत मुख्य प्रशिक्षक सनथ जयसूर्या यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. कर्स्टन यांचा कार्यकाळ १५ एप्रिल पासून सुरू होणार आहे.
श्रीलंका क्रिकेटने एका अशा व्यक्तीची निवड केली आहे, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक संघांनी यशाची शिखरे पादाक्रांत केली आहेत. कर्स्टन यांचा प्रशिक्षक म्हणून आपल्या प्रवासात हिंदुस्थानला (2008 ते 2011) मार्गदर्शन केले. कर्स्टन यांच्या प्रशिक्षणाखाली टीम इंडियाने 2011 चा वनडे वर्ल्डकप जिंकला होता. त्यांच्या कार्यकाळात टीम इंडिया कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचली होती. कर्स्टन यांच्या प्रशिक्षणाखाली दक्षिण आफ्रिकेचा संघ तिन्ही फॉरमॅटमध्ये जगातील नंबर वन संघ बनला होता. तसेच त्यांनी पाकिस्तानच्या पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावली आहे. नुकत्याच संपलेल्या टी-20 विश्वचषकात त्यांनी नामीबिया संघासाठी सल्लागार म्हणून काम पाहिले होते.

























































