गॅस टंचाईचा मोठा फटका, उद्यापासून बंगळुरूमधील हॉटेल आणि रेस्टॉरंट्स बंद राहणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बंगळुरूमधील हॉटेल उद्योगावर मोठे संकट ओढवले असून, कमर्शियल (व्यावसायिक) गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे उद्या म्हणजेच १० मार्चपासून शहरातील सर्व हॉटेल आणि रेस्टॉरंट्स बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बंगळुरू होटल्स असोसिएशनने सोमवारी यासंदर्भात अधिकृत नोटीस जारी केली आहे.

नेमके प्रकरण काय?

असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, व्यावसायिक वापरासाठीच्या गॅस सिलेंडरचा पुरवठा अचानक खंडित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, तेल कंपन्यांनी पुढील ७० दिवसांपर्यंत गॅस पुरवठ्यात कोणताही व्यत्यय येणार नाही, असे आश्वासन दिले होते. मात्र या आश्वासनानंतरही पुरवठा अचानक थांबल्याने हॉटेल चालकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

सर्वसामान्यांचे होणार हाल

हॉटेल उद्योगाचा समावेश आवश्यक सेवांमध्ये केला जातो. बेंगलुरुमध्ये राहणारे लाखो विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, वैद्यकीय कर्मचारी आणि नोकरीपेशा लोक त्यांच्या दैनंदिन जेवणासाठी हॉटेलवर अवलंबून असतात. हॉटेल बंद राहिल्यामुळे या सर्वांना अन्नासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

असोसिएशनची काय आहे मागणी?

बंगळुरू होटल्स असोसिएशनने या प्रकरणात केंद्र सरकारकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. संबंधित केंद्रीय मंत्र्यांनी याकडे लक्ष देऊन व्यावसायिक गॅसचा पुरवठा पूर्ववत करावा आणि हॉटेल उद्योगाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत करावी, अशी विनंती असोसिएशनने केली आहे. जोपर्यंत गॅस पुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहण्याचे संकेत देण्यात आले आहेत.