
पंकज तिवारी । ठाणे
भूत म्हटलं की प्रत्येकाला थोडीफार तरी भीती वाटतेच. भुताचं अस्तित्व आहे किंवा नाही, यावर विज्ञान अजूनही एका ठोस निष्कर्षाप्रत येऊ शकलेलं नाही. परंतु आजचा सुशिक्षित तरुण वर्ग हा आजही भूत-प्रेत, जादूटोणा इत्यादींवर विश्वास ठेवतो आणि या सर्वांचा फायदा ढोंगी बाबा घेत राहतात. या सर्वांचे शिकार ते कसे होतात, हे तरुणांना कळत देखील नाही. भुतांबाबतची तरुणांची भीती घालवण्यासाठी भारती संघटनेने ११ ऑगस्ट रोजी वाशिंदच्या शिर्के गावातील स्मशान भूमीमध्ये गटारी साजरी करण्याचे निश्चित केले आहे.
दररोज पोलीस स्टेशनमध्ये एक तरी अशी तक्रार असते, ज्यामध्ये तरुणाईला ढोंगी बाबाद्वारे फसवले जाते. यालाच वाचा फोडण्यासाठी ठाण्यामधील विद्यार्थी संघटना एक रात्र भुतासोबत घालवून युवकांच्या मनातील भीती तसेच अंधश्रद्धा नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, वाशिंद येथील शिर्के गावात स्मशान भूमी आहे. असं मानलं जात की, अमावस्येच्या रात्री भुतं बाहेर येऊन स्मशान भूमीत नाचतात. याचीच भीती घालवण्यासाठी ११ ऑगस्ट या अमावस्येच्या दिवशी गटारी कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या साक्षी भोईर यांनी दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये शेकडो लोकांचा सहभाग असणार आहे. या कार्यक्रमात ढोंगी बाबा विज्ञानाचे प्रयोग दाखवून लोकांना कशी भुरळ पाडतात आणि लोक त्यावर कसा विश्वास ठेवतात. या सर्व गोष्टीचा सोक्षमोक्ष लावण्याचा प्रयत्न केला आहे. याच बरोबर जे तरुण भुतांना घाबरतात. त्यांना एका निर्मनुष्य जागेतून वस्तू आणण्याचे कार्य दिले जाईल. ज्यातून त्यांची भुतांबद्दल असलेली भीती कमी होईल, अशी माहिती भोईर यांनी दिली आहे.




























































