गौतम गंभीर होणार ‘टीम इंडिया’चे नवे प्रशिक्षक?

कोलकाता नाइट रायडर्सला आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या 17 व्या हंगामातील विजेतेपद जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजाविणारे गौमत गंभीर ‘टीम इंडिया’चे नवे प्रशिक्षक होण्याची शक्यता आता बळावली आहे. ‘बीसीसीआय’कडून कोणत्याही क्षणी अधिकृत घोषणा केली जाऊ शकते. बीसीसीआय आणि गौतम गंभीर यांच्यात प्रशिक्षकपदासाठीची चर्चा सुरू आहे, अशी माहिती सूत्रांची माहिती आहे.

राहुल द्रविड यांच्या जागी गौतम गंभीरची टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली तर ते प्रथमच एखाद्या संघाचे प्रशिक्षक बनतील. कारण गौतम गंभीर यांनी याआधी आयपीएलमध्ये लखनौ सुपरजायंट्स संघाचे दोन वर्षे, तर या वर्षी कोलकाता नाइट रायडर्स संघाचे मार्गदर्शक म्हणून काम पाहिले आहे. गंभीर यांचे क्रिकेटमधील अनुभव आणि मार्गदर्शकाची भूमिका यामुळेच बीसीसीआय त्यांना टीम इंडियाचे प्रशिक्षक बनविण्यास उत्सुक आहे.

एक क्रिकेटपटू म्हणून गंभीर यांनी देशाला दोन वर्ल्ड कप विजेतेपद मिळून देण्यात महत्त्वाची भूमिका बजाविली होती. 2007 साली झालेल्या पहिल्या टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात गंभीर यांनी 75 धावांची खेळी केली होती. तेव्हा हिंदुस्थानने पाकिस्तानचा पराभव करून विजेतेपद मिळविले. त्यानंतर 2011 च्या वन डे वर्ल्ड कपमध्ये गंभीर यांनी श्रीलंकेविरुद्ध 98 धावांची संस्मरणीय खेळी केली होती.