आरपीएफ कॉन्स्टेबलचा ओला चालकावर बलात्कार

2087
ola-uber-protest

दारूच्या नशेत तर्रर्र झालेल्या आरपीएफच्या कॉन्स्टेबलने ओला कार चालकावर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना शनिवारी रात्री कर्नाक बंदर येथे घडली. कॉन्स्टेबलने चालकाला  मारहाण करीत त्याच्याकडील पैसे लुटले. शिवाय आणखी पैशांची मागणी केली. हा प्रकार कळताच माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी आरोपीला बेडय़ा ठोकल्या.

43 वर्षीय ओला कार चालक शनिवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर उभा होता. दरम्यान,  कर्नाक बंदर येथून एका पॅसेंजरला चालकाच्या ओला ऍपवर कॉल आला. त्यामुळे चालक कार घेऊन कर्नाक बंदर येथे गेला. तेथे तो पॅसेंजरची वाट बघत असताना एक अज्ञात व्यक्ती तेथे आली आणि कारमध्ये जबरदस्ती बसू लागली. कार बुक असल्याचे चालकाने सांगण्याचा त्याला प्रयत्न केला; परंतु तरीदेखील तो इसम जबरदस्ती कारमध्ये बसला आणि त्याला धमकावत कार तेथून जवळपास असलेल्या रेल्वे क्वार्टर्सकडे घेऊन जाण्यास म्हणाला. त्यानुसार  चालकाने कार त्या ठिकाणी नेल्यावर दारूच्या नशेत असलेला इसम कारमधून बाहेर पडला आणि चालकाला मारहाण करीत त्याच्याकडील 850 रुपये काढून घेतले. त्यानंतर तेथे असलेल्या गाडय़ांच्या मागे नेऊन चालकावर लैगिंक अत्याचार केला. इतके करून शांत न होता आरोपीने ठार मारण्याची धमकी देत चालकाकडे आणखी दोन हजार रुपयांची मागणी केली. त्याचवेळी तेथून जाणाऱ्या दोघा पादचाऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी त्यांनाही धमकावले.

आरोपी कॉन्स्टेबल निघाला

मग एका पादचाऱ्याने पोलीस नियंत्रण कक्षाला संपर्क साधून घडल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर याबाबत कळताच एमआरए मार्ग पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आरोपीला पकडले. चौकशीमध्ये आरोपी हा आरपीएफचा कॉन्स्टेबल असून त्याचे नाव अमितकुमार समशेर सिंग (29) असे असल्याचे स्पष्ट झाले. अमितकुमारला अटक केली असून कोर्टात हजर केले असता त्याला 20 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तो पी. डिमेलो रोडवर असलेल्या रेल्वे क्वार्टर्समध्ये राहतो.

आपली प्रतिक्रिया द्या