कोल्हापूरच्या वाड्यावस्त्यांमधून फिरताहेत काळ्या कोटातील ‘देवदूत’

1484

>>शीतल धनवडे

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनामुळे संपूर्ण देश तब्बल 21 दिवस लाॅकडाऊन करण्यात आला आहे.सरकारी वैद्यकीय यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत असताना, कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश सर्वच खासगी दवाखाने बंद असले तरी काही जनरल प्रॅक्टिशनर्स या संकटात रुग्णसेवा करण्यास सरसावले आहेत. वैद्यकीय सुरक्षा किट उपलब्ध नसतानाही चक्क रेनकोट, प्लॅस्टिकचे ग्लोव्हज आणि मास्क घालून झोपडपट्टी भागात रुग्णसेवा बजावत आहेत. अशा डॉक्टरांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दरम्यान वयोवृद्ध आणि ‘आयुष’ सह आशा वर्कर्स यांना मिळणाऱ्या सरकारी सुरक्षेप्रमाणे हमी नसल्याने, भितीने सुमारे पन्नास टक्के असे खासगी डॉक्टर अजुनही धास्तावल्याचेच चित्र आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात अनेक खासगी डॉक्टर्सनी काही ठिकाणी आपले खासगी दवाखाने बंद केल्याचे आढळून आले आहे.या कठीण काळात पुढे येऊन दवाखाने सुरू करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी देेेसाई यांनी जनरल प्रॅक्टिशनर्स असोसीएशनची बैठक घेऊन आवाहन केले होते. तरी सुद्धा बहुतांश खासगी दवाखाने बंदच असल्याने, दवाखाने बंद ठेवणा-यांवर निश्चित आपत्ती व्यवस्थान कायदेंतर्गत कारवाई केली जाईल. तसेच मेडिकल कौन्सीलकडील नोंदणी रद्द केली जाईल असा इशाराही देसाई यांनी दिला होता.

दरम्यान, जिल्ह्यात सध्या सुमारे पन्नास टक्क्यांहून अधिक जनरल प्रॅक्टिशनर्सच्या डॉक्टरांनी रुग्ण सेवा सुरू केली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून सरकारी वैद्यकीय अधिकारी,कर्मचारी तसेच आयुष आणि आशा वर्कर्स यांना संरक्षण कवच दिले आहे.त्या तुलनेत जनरल प्रॅक्टिशनर्स डॉक्टरांना कसलेही सुरक्षा कवच नाही.यातील 30 ते 49 टक्के डॉक्टर हे वयस्कर आणि काही मधुमेहग्रस्त आहेत. त्यामुळे ते रुग्णसेवा करण्यास धास्तावले आहेत.त्यात कोरोनापासुन स्वताचे संरक्षण करून रुग्णांना तपासण्यासाठी वैद्यकीय किट उपलब्ध नसल्याने, आणि ते घेणेही परवडत नसल्याने अनेक डॉक्टर सध्या या वैद्यकीय कीट ऐवजी चक्क रेनकोट घालून रुग्ण तपासत आहेत.हॅन्ड ग्लोज आणि मास्कचा तुटवडा ही लक्षात घेता,यासाठी प्लास्टिक फाईल चा उपयोग करून हे डॉक्टर आपली सेवा बजावत आहेत.बहुतांशी जनरल प्रॅक्टिशनर्स डॉक्टर हे फॅमिली डॉक्टर असल्याने, त्यांना रुग्णांची माहिती असून ते सामाजिक अंतर ठेवून आपली सेवा बजावत आहेत.या संकटकाळात एकदाही आपला दवाखाना बंद न ठेवता,जनरल प्रॅक्टीशनर्स असो.चे एक्झीक्युटीव्ह मेंबर डॉ.राजेश सातपुते हे रेनकोट घालून रग्णसेवा करत आहेत.चेहरा झाकण्यासाठी त्यांनी प्लास्टिक फाईल चा कौशल्याने वापर केला आहे.विषेश म्हणजे राजेंद्रनगर,साळोखे पार्क आदी झोपडपट्टी परिसरात रुग्ण देतील ते सेवाशुल्क घेत आहेत. काही रुग्णांवर मोफत उपचारही करण्यात येत असल्याचे त्यांनी ‘दैनिक सामना’शी बोलताना सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या