
श्रीरामपूर शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. येथे जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणासह गंभीर गुन्ह्यांतील आरोपी आणि सध्या जामिनावर असलेल्या बंटी उर्फ अस्लम शबीर जहागीरदार याच्यावर भरदिवसा गोळीबार झाला. यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान कब्रस्तानातील एका अंत्यविधीला उपस्थित राहून परतत असताना बंटी जहागीरदार हा मित्र अमीन हाजी यांच्या दुचाकीवरून घरी निघाला होता. सेंट लूक हॉस्पिटलच्या ओपीडी गेटजवळ पोहोचताच, दबा धरून बसलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी दोन पिस्तुलांमधून त्याच्यावर बेधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात त्यांच्या छातीच्या दोन्ही बाजूंना, पायाला, पाठीला तसेच कानाजवळून एक गोळी गेली. एकूण सहा गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती आहे.
गोळीबारानंतर बंटी जहागीरदार हा जागीच कोसळला. परिसरातील नागरिकांनी तातडीने त्याला श्रीरामपूर येथील साखर कामगार दवाखान्यात दाखल केले. तेथे डॉ. रविंद्र जगधने, डॉ. संजय अनारसे व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रथमोपचारासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्याला कार्डियाक व्हॅनद्वारे नगर येथील साईदीप हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. उपचार सुरू असतानाच सायंकाळी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.



























































