गेवराई तालुक्यातील 230 कोरोना पॉझिटिव्ह रूग्णापैकी 180 रूग्ण कोरोना रोगातून बरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेवराई तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णाची संख्या वाढत आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही वाढत आहे. सोमवार दि.24 ऑगस्ट रोजी प्राप्त अहवालानुसार तालुक्यात 230 पैकी 180 रूग्ण कोरोनातुन बरे झाले असून 37 जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरू असून 13 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. संजय कदम यांनी दिली आहे. गेवराई तालुक्यात पुणे, संभाजीनगर, मुंबईवरून कोरोना महामारी या रोगामुळे आपल्या गावी परतलेल्या नागरिकांमुळे शहरी भागात व ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झाला होता.

तालुक्यात पहिला कोरोना बाधित रूग्ण हा इटकूर या ठिकाणी निघाल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर सातत्याने कोरोना रूग्णाची संख्या वाढत गेली. सोमवार 24 रोजी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय कदम यांनी दिलेल्या कोरोना अहवालानुसार आतापर्यंत ग्रामीण भागात कोरोना लागण 91 जणांना तर शहरी भागात 139 अशी एकुण 230 जणांना कोरोनाची लागण झाली होती. यामध्ये ग्रामीण भागातील कोरोना लागण होऊन बरे झालेले 57 रूग्ण तर शहरी भागातील कोरोना लागण होऊन बरे झालेले 123 असे एकूण 180 जण कोरोना रोगातून बरे झालेले आहेत तर ग्रामीण भागातील 6 व शहरी भागातील 7 जण असे एकुण 13 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

बाकी कोरोना रोगावर एकुण 37 जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरू असून हे कोरोना बाधित रूग्ण बीड जिल्हा रूग्णालयात ग्रामीण भागातील 8 जण उपचार घेत आहेत. तर संभाजीनगर येथील रूग्णालयात शहरी भागातील 2 कोरोना बाधित रूग्ण हे उपचार घेत आहेत. तर गेवराई उपजिल्हा रूग्णालयात ग्रामीण भागातील 20 व शहरी भागातील 7 असे एकुण 27 कोरोना बाधित रूग्ण उपचार घेत असून, तथापि वाढत्या रूग्ण संख्येने शहर व ग्रामीण भागात चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून नागरिकांना सूचना देण्यात येत असून यामध्ये सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित अंतर ठेवा, वारंवार स्वच्छ हात धुवा, तोंडाला मास्क वापरा असे आवाहन करण्यात येत आहे. या सर्व गोष्टींचे पालन केल्यास काही अंशी का होईना कोरोनापासून आपला बचाव करू शकतो असे प्रशासनाकडून नागरिकांना सांगण्यात येत आहे.