भयंकर! दुष्काळात पाणी पुरवठा करणार्‍या विहिरीत विष टाकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । गेवराई

गेवराई गावासह आजुबाजुच्या वस्ती, तांड्यांना पाणी पुरवठा करणार्‍या विहिरीत अज्ञात माथेफिरूने दोन बाटल्या किटक नाशक टाकल्याची खळबळजनक घटना घडली. सकाळी विहिरीवर पाणी भरण्यासाठी लोक गेल्यानंतर ही घटना उघडकीस आली. गेवराई तालुक्यातील भोजगाव येथे गी घटना घडली असून पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. विहिरीतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. अज्ञात माथेफिरूच्या भयंकर मानसिकतेमुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

दुष्काळी परिस्थितीमध्ये परिसरात बहुतांश विहिरी, बोअर आणि पाण्याचे स्त्रोत आटले आहे. गेवराई तालुक्यातील भोजगाव येथील नागरिकांसाठी आणि परिसरातील वस्ती, तांड्यावरील नागरिकांसाठी गावातील रावसाहेब शिंदे यांच्या शेतातील विहिरीतून पाणी पुरवठा होतो. सदरची विहिरी शासनाने अधिग्रहण असून भर उन्हाळ्यात या विहिरीतून टँकर भरले गेले. अद्यापही टँकरमधून वाडी, वस्ती, तांड्यावरील लोकांची तहान भागवली जाते आहे. मात्र रात्री अज्ञात माथेफिरूने या विहिरीत किटक नाशकाचे दोन डब्बे ओतले. त्याचबरोबर विहिरीतून पाणी काढणार्‍या मोटरच्या वॉलमध्येही किटक नाशक टाकले.

गुरुवारी सकाळी भोजगाव येथील लोक पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेले त्यावेळी किटक नाशकाचा दुर्गंध पाण्यातून येऊ लागला. याची माहिती मिळाल्यानंतर रावसाहेब शिंदे यांनी पोलिसांना कळवले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक बाळासाहेब बडे, पोलीस कॉन्स्टेबल खरात, तागड, बहिरवाळ, खटाणे यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. विहिरीतील पाण्याची नमुने तपाण्यासाठी पाठवण्यात आले असून अज्ञाताच्या खोडसळपणावर गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.