
घाटकोपर केंद्राचा फिरकीवीर श्लोक कडवने घेतलेली हॅटट्रिक तसेच दुसऱ्या डावात विहान जोबनपुत्रने टिपलेल्या 6 विकेटच्या जोरावर घाटकोपर केंद्राने ठाणे केंद्रावर शानदार विजय नोंदवला. 33 व्या एलआयसी एमसीए कल्पेश कोळी स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात ठाणे केंद्र ‘ब’ संघाला पहिल्या डावात 122 आणि दुसऱ्या डावात 88 धावांवर रोखल्यानंतर घाटकोपर पेंद्राने पहिल्या डावात 199 आणि नंतर बिनबाद 12 धावा करत विजयाची नोंद केली.
घाटकोपर केंद्राकडून आयुष शेटेने पहिल्या डावात 60 तर ऋषभ सदके (33) आणि रुशन फारुकी (32) यांनी मोलाचे योगदान दिले. ठाणे केंद्राच्या सिद्धांत काशिकेदारने पहिल्या डावात 42 धावांत 6 विकेट्स टिपले. अन्य सामन्यांत माटुंगा जिमखान्यावर झालेल्या सामन्यात सोहम कांगणे याने दुसऱया डावात नाबाद 100 धावांची खेळी साकारली असली तरी त्याच्या भिवंडी व वांगणी केंद्राला पहिल्या डावातील पिछाडीच्या बळावर पराभव पत्करावा लागला. भिवंडी-वांगणी पेंद्राचा पहिला डाव 139 धावांवर संपुष्टात आला होता. त्यानंतर माटुंगा केंद्राने प्रचित आमकर (64), यश चौहान (55), देवाशिष घोडके (40) यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर 235 धावा करत पहिल्या डावात 96 धावांची आघाडी घेतली होती.
‘अ’ गटात एमसीए अकादमी ‘ब’ केंद्राने कल्याण केंद्रावर विजय साकारला. कल्याण केंद्राला पहिल्या डावात 139 धावांवर रोखल्यानंतर एमसीए ‘ब’ संघाने विराट यादवच्या 40 धावांच्या खेळीमुळे 195 धावा केल्या होत्या. त्यानंतर विराट यादवचे 5 बळी तसेच नारायण ठाकूरच्या 5 विकेट्सच्या जोरावर कल्याण केंद्राला 114 धावांवर गारद केले. विजयासाठी ठेवलेले 59 धावांचे लक्ष्य एमसीए ‘ब’ संघाने 2 विकेट्स गमावून सहज पार केले.
शॉन कोरगावकर याने अष्टपैलू कामगिरी (78 धावा आणि 60 धावांत 5 विकेट्स) साकारली तरी आझाद मैदान केंद्राला पहिल्या डावातील पिछाडीच्या बळावर पराभव पत्करावा लागला. अजित शुक्लाचे 5 आणि सुधन सुंदरराजच्या 3 विकेट यामुळे वाशी केंद्राने आझाद मैदान केंद्राचा पहिला डाव 205 धावांवर संपुष्टात आणला. प्रत्युत्तरादाखल वाशी केंद्राने पहिल्या डावात सर्वबाद 223 धावा करत महत्त्वपूर्ण आघाडी घेतली होती. त्यानंतर आझाद मैदान केंद्राने दुसऱ्या डावात 143 केल्या, पण त्यांना पराभव टाळता आला नाही.