दैव बलवत्तर…एका फोनमुळे भाऊ वाचला! केईएममधील जखमीची भावना

मुंबईत सोमवारी सायंकाळी 4 वाजता अचानक सोसाटय़ाच्या वाऱयासह तुफान पाऊस सुरू झाला. याच वेळी आमची मुलं पेट्रोल पंपावर आली होती. ते दुचाकीमध्ये पेट्रोल भरून निघण्याच्या तयारीत होतो, मात्र पावसामुळे काही वेळ ते थांबले. त्याच वेळी वरुण याला फोन आल्याने तो बोलत थोडा दूर गेला. तर एकजण गाडीजवळच होता. त्याच वेळी भयंकर मोठा आवाज झाला आणि महाकाय होर्डिंग कोसळले. यात शुभम गांगुर्डे याला जबर दुखापत झाली. मात्र सुदैवाने भाऊ वाचल्याची भावना केईएम रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू असलेल्या शुभम गांगुर्डे याच्या बहिणीने दिली.

घाटकोपर दुर्घटनेत जखमी झालेल्यांमधील पाच जणांवर पालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या सर्वांची प्रकृती आता स्थिर आहे. या दुर्घटनेत जखमी झालेले अशोक गुप्ता हे गॅरेज व्यावसायिक आहेत. ते घाटकोपरमध्येच वास्तव्यास असून ते पेट्रोल पंपावर दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी आले होते. पेट्रोल भरूनही झाले होते, मात्र निघण्याच्या आतच त्यांच्यावर महाकाय होर्डिंग कोसळले.

घाटकोपरमध्येच राहणारे आणि लिफ्ट पंपनीत काम करणारे सचिन भालेराव यांच्या कामाच्या पहिल्याच दिवशी हा अपघात घडला. वादळ सुरू झाल्याने ते पेट्रोल भरून झाल्यानंतरही उभे होते. मात्र अचानक मोठा आवाज झाला. यावेळी त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या खांद्यावर स्लॅब कोसळल्याने ते जबर जखमी झाले. आपण थोडक्यात वाचलो असलो तरी वेदना होत असल्याचे ते म्हणाले.

कुटुंबाचा आधारच गेला

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत रिक्षाचालक मोहम्मद अक्रम, टॅक्सीचालक बशीर अहमद, सतीश वीरमहाद्दुर सिंग, असिक अली शेख, पेट्रोल पंपावर काम करणारे सचिन यादव, पेट्राल पंपावर काम करणारे ठाण्याचे ड्रायव्हर पूर्णेश जाधव यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संबंधितांच्या कुटुंबांचा आधारच गेला आहे. मृत रिक्षाचालक मोहम्मद अक्रम हे कामराज नगरचे रहिवासी होते. त्यांना चार भाऊ आहेत. एक मुलगी आहे. त्याच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबाचा आधारच गेला आहे.

लोहमार्ग पोलीसही जबाबदार

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला लोहमार्ग पोलीसही तेवढेच जबाबदार असून मुंबई पोलिसांनी संबंधित अधिकारी वर्गावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महाराष्ट्र शासन आणि मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली आहे. लोहमार्ग पोलिसांनी परवानगी दिली असून ते भाडे घेत असल्याने त्यांची जबाबदारी अधिक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

जखमींना शिवसेनेचा आधार

घाटकोपर दुर्घटनेतील जखमींना पालिकेच्या राजावाडी, केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामध्ये परळ केईएम रुग्णालयातही पाच जण आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत. शिव आरोग्य शिव आरोग्य सेनेचे कार्याध्यक्ष डॉ. किशोर ठाणेकर यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र राज्य समन्वयक जितेंद्र सकपाळ यांनी ऑर्थोपेडिक वॉर्ड 20 येथे भेट देत विचारपूस केली. जखमींना वेळीच उपचार मिळावे यासाठी केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ संगीता रावत यांची भेट घेतली. यावेळी शिव आरोग्य सेनेचे लालबाग प्रभाग समन्वयक नंदकुमार बागवे,हिंदुस्तान माथाडी का. सेनेचे लितेश केरकर आदी उपस्थित होते.

शिवसैनिक मदतीला धावले

घाटकोपर दुर्घटनेनंतर तातडीने मदतकार्य करण्यासाठी शिवसैनिक रुग्णालय व घटनास्थळी धावले.शिवसैनिकांनी जागोजागी वाहतूक व्यवस्था नीट करण्याचे काम केले. अग्निशमन दलाच्या गाडय़ांना जागेवर पोहोचण्यास मदत केली. यावेळी शिवसेना-महाआघाडीचे उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय दिना पाटील, ईशान्य मुंबई विभागप्रमुख सुरेश पाटील, उपविभाग प्रमुख चंद्रपाल चंदेलिया, शिव आरोग्य सेना मुंबई जिल्हा सहसमन्वयक प्रकाश वाणी, विधानसभा संघटक सचिन भांगे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.