घोडबंदर – ड्रेनेजच्या खड्ड्यात कार कोसळली, एकाचा मृ्त्यू

सामना प्रतिनिधी । ठाणे

ठाण्यातील घोडबंदरजवळ मुल्ला बाग येथे एक कार ड्रेनेजसाठी खोदलेल्या खड्ड्यात कोसळून अपघात झाला आहे. बुधवारी सकाळी झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला.

सचिन काकोडकर यांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सचिन हे मारुती सुझुकी आर्टिका या कारने घोडबंदरकडे जात होते. मुल्ला बाग भागात ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी भले मोठे खड्डे खणण्यात आले आहेत. या खड्ड्यांमध्ये कार पलटी झाली आणि सचिन काकोडकर हे जखमी झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी त्यांना बाहेर काढले आणि रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.