नागपुरात भुताची अफवा, ‘ती’ प्रतिमा नसून कागद असल्याचा अंनिसचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागपूरमध्ये भूत दिसल्याची सध्या जबरदस्त अफवा पसरली आहे. या भुताची प्रतिमा सीसीटीव्हीत कैद झाल्याचे सांगत त्याची दृश्ये व्हायरल करण्यात आली आहे. नागपुरातील शताब्दी नगर भागात मेश्राम कुटुंबीयांनी भूताची प्रतिमा पाहिल्याचा दावा केला आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समितीने मात्र ही सगळी एक अफवा असून ती प्रतिमा वैगरे काही नसून तो कागद किंवा एखादा पक्षी असावा असं म्हटलंय.

नागपूरच्या शताब्दी नगर भागात राहणारे राजेंद्र मेश्राम आपल्या कुटुंबासह दोन दिवसापूर्वीपर्यंत त्यांच्या घरात राहात होते, मात्र सध्या त्यांचं घर बंद असून ते घरातून निघून गेले आहेत. त्यांनी भूताला घाबरून घर सोडल्याची चर्चा आहे. मेश्राम यांनी त्यांच्या घराच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरा बसवला आहे. सीसीटीव्हीची दृश्ये तपासत असताना 19 जुलैच्या रात्री त्यांना एक विचित्र प्रतिमा सीसीटीव्हीत कैद झाल्याचं दिसलं. एक धूसर आकृती जमिनीवरून हवेत वेगाने जाताना त्यांना दिसलं होतं. ही प्रतिमा म्हणजे भूतच असणार असं मेश्राम कुटुंबीयांना वाटतंय.

मेश्राम यांचं घर जिथे आहे त्या घराच्या परिसरात एक विहीर आहे. काही वर्षांपूर्वी याच विहिरीमध्ये एका मुलीने जीव दिला होता आणि त्यानंतर त्यातून विचित्र आवाज ऐकाला येतात अशी अफवा या भागात पसरलेली आहे. हा आवाज ज्या भुताचा आहे तेच भूत आपल्याला सीसीटीव्हीत दिसलं असावं अशी भीती मेश्राम कुटुंबीयांना वाटते आहे.  भूताची दृश्ये सीसीटीव्हीत कौद झाल्याची अफवा नागपुरात वेगाने पसरली. ही अफवा अंनिस कार्यकर्त्यांच्या कानावर आल्यानंतर त्यांनी राजेंद्र मेश्राम यांचे घर गाठले. मेश्राम यांना त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला की सीसीटीव्हीमध्ये दिसणारी ही प्रतिमा भुताची नसून एखाद्या वस्तूची आहे. कागद किंवा पक्षासारखी ही गोष्ट सीसीटीव्हीसमोरून उडत गेली असावी असं पटवून देण्याचाही अंनिस कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला. भूत आहे हे सिद्ध केल्यास आपण त्या व्यक्तीला 25 लाख रुपये देऊ असं आव्हानही अंनिस कार्यकर्त्यांनी दिलं आहे.