
पनवेलमधील महामार्गालगत असलेल्या ‘मिडल क्लास’ परिसरात उभारण्यात आलेल्या महाकाय होर्डिंगचा अर्धा भाग रस्त्यावर कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. घाटकोपरची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून ‘हे धोकादायक होर्डिंग तात्काळ काढून टाकावे’ अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मिडल क्लास परिसरातील भल्यामोठ्या होर्डिंगचा सांगाडा कमकुवत झाला आणि त्याचा एक मोठा भाग थेट रस्त्याच्या कडेला येऊन पडला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र त्याचा अर्धा भाग अजूनही तसाच असून कमकुवत झालेले हे महाकाय होर्डिंग कधीही कोसळून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे केवळ दुरुस्ती करून भागणार नाही तर हे संपूर्ण होर्डिंग हटवा, अशी आक्रमक भूमिका नागरिकांनी घेतली आहे. एकीकडे अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंगवर कारवाई करण्याचे दावे पालिकेकडून केले जातात. मात्र महामार्गालगत असलेले हा ‘यमदूत’ प्रशासनाला का दिसत नाही, असा संतप्त सवाल स्थानिकांनी केला आहे.






























































