फाळणीनंतर मुस्लिम बांधवांना पाकमध्ये पाठवले नाही ही आमची चूक! गिरीराज सिंह यांच्या विधानाने पुन्हा वादंग

829

देशाच्या फाळणीनंतर 1947 मध्ये सर्व मुस्लिम बांधवांची रवानगी धर्माच्या नावाखाली निर्माण केलेल्या पाकिस्तानात केली नाही ही आमच्या पूर्वजांची मोठी चूकच होती. त्याच चुकीची फळे आम्ही आता भोगत आहोत, असे खळबळजनक विधान करीत भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. ते बिहारच्या पूर्णिया येथे पत्रकारांशी बोलत होते.

1947 अगोदर आमचे पूर्वज देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा देत होते आणि पाकिस्तानचे जनक बॅरिस्टर मोहमद अली जीना इस्लामी राष्ट्र बनवण्याची योजना आखत होते असे सांगून गिरीराज म्हणाले, आमच्या पूर्वजांनी फाळणीच्या वेळेस सर्व मुस्लिमांना पाकिस्तानात पाठवले नाही त्या चुकीचा त्रास आम्हाला आज होतोय. देशाप्रति समर्पित होण्याची वेळ आता आलीय. आम्हा हिंदूंना निर्वासित व्हायची वेळ आली तर आम्ही कुठे जायचे याचा विचार गंभीरपणे करायला हवाय. कारण हिंदुस्थान सोडला तर हिंदूंना आश्रय घेता येईल असा एकही देश या भूतलावर नाहीय. भाजप नेते गिरीराज सिंह हे ‘फायरब्रॅण्ड’ राजकीय नेते म्हणून ओळखले जातात.

आपली प्रतिक्रिया द्या