गिरीश महाजन गटारातील बेडूक; जरांगेंचा टोला, मुंबई आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी 123 गावांतील मराठा बांधवांची बैठक

मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिंदे आणि पवार यांचा वापर करून घेतला. फडणवीस भुजबळांना तिसरे उपमुख्यमंत्री करतील, असे वक्तव्य करणारे गिरीश महाजन हे गटारातील बेडूक असल्याचा टोला मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी लगावला. मराठा समाजाच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

आंतरवाली सराटी येथे गोदा पट्टय़ातील 123 गावांतील मराठा समाजाची बैठक पार पडली. या बैठकीत जरांगे यांनी 29 ऑगस्टला मुंबई येथे होणाऱया मराठा समाजाच्या आंदोलनाची तयारी करण्याच्या सूचना दिल्या. या बैठकीनंतर जरांगे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे, अजित पवार यांचा वेळेनुसार उपयोग करून घेतला आहे. आता ते छगन भुजबळांचा वापर करून मराठा-ओबीसीत दंगल घडवून आणणार असल्याचा आरोप त्यांनी केला. फडणवीस हे भुजबळ यांना राज्याचा तिसरा उपमुख्यमंत्री करतील या गिरीश महाजन यांच्या वक्तव्याचा जरांगे यांनी समाचार घेतला. भुजबळांना तिसरा उपमुख्यमंत्री करणार हा फडणवीसांचा कावा असल्याचा आरोप जरांगे-पाटील यांनी केला.