
हनी ट्रॅपसह अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा गुन्हा असलेल्या प्रफुल्ल लोढा नावाच्या व्यक्तीला भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. लोढा हा मंत्री गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय आणि विश्वासू कार्यकर्ता असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी आज केला. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली आहे.
मुंबईतील अंधेरी एमआयडीसी आणि साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 62 वर्षीय प्रफुल्ल लोढावर नोकरीचे आमिष दाखवून एका 16 वर्षीय मुलीसह तिच्या मैत्रिणीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. मुलींचे अश्लिल छायाचित्र काढून, मुलींना डांबून ठेवून त्यांना धमकावल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. पोस्कोसह बलात्कार, खंडणी आणि हनी ट्रॅपचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 5 जुलै रोजी प्रफुल्ल लोढाला अटकही करण्यात आली होती. या प्रकरणी एकनाथ खडसे यांनी गंभीर आरोप केले आहेत.
प्रफुल्ल लोढाच्या गुह्यांचा तपास करताना मुंबई पोलिसांनी जळगावच्या जामनेर आणि पहूर या ठिकाणी लोढा याच्या मालमत्तेची तपासणी केली. त्याचे लॅपटॉप, पेन ड्राईव्ह, इलेक्ट्रॉनिक डिवाइस पोलिसांकडून जप्त करण्यात आले. दरम्यान, हा तपास त्याच्याकडे आणखी काही सीडी मिळतात का, हे शोधण्यासाठी होते. मात्र, त्याने ते कुठेतरी लपवून ठेवले असावेत, त्यामुळे पोलिसांना ते पुरावे हस्तगत करता आले नाहीत. एकेकाळी महाजन यांचा कट्टर विरोधक असणारा लोढा मधल्या काळात महाजनांचा विश्वासू बनल्याचा दावाही खडसे यांनी केला आहे. या आरोपामुळे खडसे व महाजन यांच्यातील वाद आणखी उफाळून येण्याची चिन्हे आहेत.
भाजपचा बडा नेता अडचणीत येणार
या लोढाने दिलेले काही आक्षेपार्ह फोटो आपण भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. दिल्लीतील भाजप नेत्यांनी त्याची गंभीर दखल घेत संतापही व्यक्त केला होता. मात्र, मधल्या कालखंडात ते फोटो गायब झाल्याचे खडसे म्हणाले. तर लोढा याच्याकडील आक्षेपार्ह साहित्य भाजपच्या एका बड्या नेत्याला अडचणीत आणू शकते. त्यामुळे पोलिसांकडून योग्य प्रकारे चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही खडसे यांनी केली आहे.