खास मैत्रिणीला भेटायला यूपीहून ती लाखो रुपये घेऊन मुंबईला पळून आली, उपशाखा संघटकामुळे सुखरूप घरवापसी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इन्स्टाग्रामवर दोघींची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मग घट्ट मैत्रीत झाले. आपल्या आवडत्या मैत्रिणीला भेटण्यासाठी तिने यूपीहून मुंबई गाठली. सोबत वडिलांनी लग्नासाठी जमवलेले साडेतीन लाख घेऊन ती शहरात आली. मग दोघीही सोबत राहू लागल्या, पण पैसा संपल्यानंतर तिने नोकरी मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे बनविण्याचा आटापिटा सुरू केला. पण शिवसेनेच्या एका महिला उपशाखा संघटकामुळे तिची सुखरूप घरवापसी झाली.

अंजली सिंग (21, नाव बदललेले) ही यूपीची राहणारी आहे. वर्ष-दीड वर्षापूर्वी तिची मुंबईच्या माझगाव परिसरात राहणाऱया कोमल (नाव बदललेले) हिच्याशी इन्स्टाग्रामवर मैत्री झाली. एकीकडे असे असताना दुसरीकडे कोमलचे आईवडील तिच्यासाठी स्थळ बघत होते. पण कोमलला भेटण्यासाठी ती आतूर झाली होती. अखेर भेटीसाठी अंजलीने यूपीतून पलायन करत कोमलच्या मदतीने माझगाव येथे एक खोली भाडय़ाने घेतली. काही महिने दोघी सोबतदेखील राहिल्या, पण भाडे देण्यासाठी पैशाची चणचण भासू लागल्यानंतर कोमलने तिकडून आपला मुक्काम आग्रीपाडा येथे हलवला. दरम्यान नोकरीसाठी आधार व पॅनकार्डची आवश्यकता असल्याने ते बनविण्यासाठी ती शिवसेना शाखा क्रमांक 210च्या उपशाखा संघटक विद्या रभाडिया यांना जाऊन भेटली, पण विद्या यांना प्रकरण संशयास्पद वाटल्याने त्यांनी अंजलीवर लक्ष ठेवले. दरम्यान, दोन महिन्यांपासून आपल्या मुलीचा शोध घेणाऱया तिच्या आईवडिलांना मुलगी भायखळा येथे असल्याचे समजले.

आईवडिलांसोबत परतली
अंजलीच्या पालकांनी भायखळा पोलीस ठाण्यात येऊन मुलीबाबत सांगितल्यानंतर उपनिरीक्षक विजय पाटील यांनी लगेच अंजलीचा शोध सुरू केला. पाटील यांना मिळालेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधला असता त्यावर स्वतः अंजली बोलताना सापडली. तेव्हा विद्या रभाडिया तिच्यासोबत होत्या. पाटील यांनी विद्या यांना हकीकत सांगितल्यानंतर विद्या यांनी अंजलीला पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर तिला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.