वर्ध्यातील टाकळीत विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने चिमुकलीचा मृत्यू; एक मुलगा गंभीर जखमी

वर्धातील टाकळी येथे विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर या दुर्घटनेत एक मुलगा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी अल्लीपूर पोलीस ठाण्यातील टाकळी (दरणे) येथे घडली.

टाकळी (दरणे) येथील भालेराव यांच्या घराच्या शिवारात लहान मुले खेळत असताना दोनजणांना अचानक विद्युत तारेचा धक्का लागला. या दुर्घटनेत खुशी संदीप सावरकर (वय 6) आणि ईश्वर काळे (वय 7) हे दोघे विद्युत प्रवाहाचा संपर्कात आल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. खुशीची प्रकृती गंभीर असल्याने तिला सेवाग्राम येथील रुग्णालयात नचाना तिचा मृत्यू झाला. ईश्वर काळेला नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अल्लीपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रफुल्ल डाहुर्ले तसेच सतीश हांडे, प्रफुल्ल चंदनखेडे, निलेश मुगुलवार यांनी भेट देत पाहणी केली.