
इमारतीचे बांधकाम सुरू असताना रहिवाशांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी न घेणे एका चिमुकलीच्या जिवावर बेतल्याची घटना टिळक नगर येथे घडली. इमारतीच्या गेटमधून आत येत असताना प्रतिभा शिंगारे (10) या चिमुकलीच्या डोक्यात सिंमेटचा ब्लॉक पडला. यात गंभीर जमखी झालेल्या प्रतिभाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
टिळक नगरच्या अमरमहल येथील पंचशील नगर एसआरए इमातीच्या ‘सी’ विंगमध्ये करुणा खरात या मावशीकडे प्रतिभा राहत होती. मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास प्रतिभाला तिच्या काकाने दूध व बिस्कीट घेऊन दिले. ते घेऊन प्रतिभा इमारतीत जात असताना अचानक वरून सिमेंटचा ब्लॉक खाली प्रतिभाच्या डोक्यात पडला. यामुळे प्रतिभा जागीच बेशुद्ध पडली. नागरिकांनी तिला तत्काळ राजावाडी रुग्णालयात नेले, परंतु प्राथमिक उपचार केल्यानंतर तेथून तिला अन्य रुग्णालयात नेण्यास सांगण्यात आले. त्यामुळे तिला घाटकोपर येथील हिंदू सभा रुग्णालयात नेण्यात आले. तेथून नंतर अधिक उपचारासाठी प्रतिभाला केईएम रुग्णालयात नेण्यात आले. तेथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. प्रतिभाच्या मृत्यूला इमारतीचे बांधकाम करणारा बिल्डर तसेच इमारतीमधील पाच सोसायटय़ांचे अध्यक्ष व पदाधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करीत तशी तक्रार प्रतिभाच्या पालकांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात दिली. टिळकनगर पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. बांधकाम करणाऱया बिल्डरसह सोसायटय़ांच्या पदाधिकाऱयांनी सुरक्षेची कोणतीही उपाययोजना न केल्यामुळेच प्रतिभाचा नाहक बळी गेला असा तिच्या पालकांचा आरोप आहे.


























































