गळ्यात फास, हातात मोबाईल; सेल्फी आत्महत्येचे गूढ वाढले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सेल्फी घेताना जीव गेल्याची प्रकरणे वाढत असताना आणखी एक घटना समोर आली. बारा वर्षाच्या मुलीला सेल्फीचा नाद जीवघेणा ठरलाय. ही मुलगी सेल्फी घेत असताना गळफास बसला आणि तिला जीव गमवावा लागला.

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये ही घटना घडली आहे. मुलीचे आई-वडिल दोघंही पोलीस आहेत. मुलगी सातवीत शिकत असून मंगळवारी आईवडील कामावर गेले होते. तसेच लहान भाऊ-बहिण शेजारी आजीकडे गेले असताना तिने ओढणी मानेभोवती गुंडाळुन गळफास घेतला. बराच वेळ ती घराबाहेर न आल्याने आजी तिच्या बहिणीला घेऊन खोलीत आली असता ती गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांना दिसली. तिला तत्काळ दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलिसांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

घटनेमागचं कारण अद्याप समजले नसले तरी आई-वडिलांनी तिचा मोबाईल तपासला असता त्यांना धक्काच बसला. तिच्या मोबाईलमध्ये शेवटचा फोटो गळफास घेताना सेल्फी काढल्याचा होता. त्यामुळे सेल्फी घेण्याच्या नादात तिला गळफास बसला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र त्यानंतर काही वेळाने तिच्या कुटुंबाला एक सुसाईड नोट सापडली असून मुलीच्या हातावर देखील तिने कुणाला तरी उद्देशून ‘सॉरी जी’ असे कोरलेले होते. ती कोणाला तरी गळफास घेत असल्याचा सेल्फी पाठवण्याचा प्रयत्न करत होती पण तिला तो पाठवता आला नाही.  दरम्यान पोलीस ही आत्महत्या आहे की अपघात याचा तपास करत आहेत.