मैत्री न स्वीकरल्याने ठाण्यात तरुणीची हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन ।  ठाणे

ठाण्याच्या हाजुरी येथील आरटीओ कार्यालयाजवळ एका २० वर्षीय तरुणीची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली आहे. भर दिवसा तरुणीवर झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात घबराट पसरली आहे. उपचारासाठी या तरुणीला एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मृत तरुणीचे नाव प्राची झाडे असून खून करणार्‍या माथेफिरू तरुणाचे नाव आकाश पवार आहे.

आकाशचं प्राचीवर एकतर्फी प्रेम होतं, यापूर्वीही प्रेम न स्वीकारल्याने आकाशने प्राचीला मारण्याची धमकी दिली होती. प्राचीने आकाशविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. पुढे प्राचीला त्रास न देण्याच्या आश्वासनावर हे प्रकरण थांबले होते.

पण रविवारी फ्रेंडिशिप डे होता. त्या निमित्ताने आकाशने तिला रस्त्या गाठले आणि किमान आपली मैत्री तरी स्वीकारावी अशी गळ त्याने प्राचीला घातली. पण प्राचीने या सगळ्याला नकार दिला. आकाशने तिच्याशी हुज्जत घातली आणि प्राचीशी भर रस्त्यात भांडण करण्यास सुरूवात केली. रागाच्या भरात आकाशने प्राचीच्या पोटात चाकू खुपसला आणि अंगावर सपापसप वार करून तिथून फरार झाला. अवघ्या चार तासांत आकाशला पकडण्यात पोलिसांना यश आले असून पुढील तपास सुरू आहे.