बेस्ट कर्मचाऱ्यांना तातडीने बोनस द्या, अन्यथा चक्का जाम; बेस्ट कामगार सेनेचा प्रशासनाला जोरदार इशारा

दिवाळी तोंडावर आली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना अद्याप बोनस मिळालेला नाही. यासंदर्भातील बेस्ट आणि महापालिका प्रशासनाच्या उदासीन धोरणाविरोधात गुरुवारी बेस्ट कामगार सेनेने तीव्र निदर्शने केली. बेस्ट कर्मचाऱ्यांना तातडीने बोनस द्या, अन्यथा रस्त्यावर उतरून चक्का जाम करू. त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील, असा इशारा बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष, आमदार, शिवसेना उपनेते सचिन अहिर यांनी बेस्ट आणि महापालिका प्रशासनाला दिला.

‘मुंबईची दुसरी जीवनवाहिनी’ असलेल्या बेस्ट उपक्रमामध्ये अविरत सेवा देणारे कर्मचारी बोनसच्या प्रतीक्षेत आहेत. याला प्रशासनाची अनास्था जबाबदार असल्याचा आरोप करीत बेस्ट कामगार सेनेने गुरुवारी वडाळा बस आगाराबाहेर तीव्र निदर्शने केली. ‘बोनस आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा’, ‘कोण म्हणते देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही’ अशा घोषणा देत बेस्ट कर्मचाऱ्यांनी आगाराचा परिसर दणाणून सोडला. दिवाळीपूर्वी बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस वाटप करा, अन्यथा रस्त्यावर उतरून चक्का जाम आंदोलन केले जाईल, त्याची जबाबदारी सरकारची राहील, असा इशारा बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी दिला. याप्रसंगी मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव, बेस्टचे माजी चेअरमन अनिल कोकीळ, बेस्ट कामगार सेनेचे प्रमुख मार्गदर्शक गौरीशंकर खोत, सरचिटणीस नितीन नांदगावकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वतीने उमेश सारंग यांनी बोनस व इतर हक्कांकडे लक्ष वेधले. आंदोलनात शेकडो बेस्ट कामगार सहभागी झाले होते.

बेस्टचा गळा घोटण्याचे सत्ताधाऱ्यांचे कारस्थान

मेट्रो-3च्या मार्गिकेवर प्रवासी सुविधेच्या नावाखाली एमएमआरडीएने ‘सिटीफ्लो’ या कंपनीशी भागीदारी केली आहे. एकनाथ शिंदेंच्या ताब्यातील नगरविकास विभागाने घेतलेल्या या निर्णयावर सचिन अहिर यांनी जोरदार हल्ला चढवला. मेट्रो-3 च्या स्थानक परिसरात बेस्ट उपक्रमाची सेवा का सुरू केली नाही? सत्ताधाऱ्यांचा बेस्टवर विश्वास नाही का? बेस्टऐवजी ‘सिटीफ्लो’ कंपनीशी केलेली भागीदारी हा खासगीकरणाचा नमुना आहे. या माध्यमातून बेस्टचा गळा घोटण्याचे कारस्थान सत्ताधाऱ्यांनी सुरू ठेवले आहे, असा आरोप अहिर यांनी केला.