शेतकऱ्यांना भीक नको, त्यांचा हक्क द्या; प्रकाश आंबेडकर यांची अजित पवार यांच्यावर टीका

सरकार शेतकऱ्यांचे कर्ज किती काळ माफ करत राहणार, या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधानावर वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे. सरकारला शांत झोप मिळावी म्हणून शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात का, असा प्रश्न आंबेडकर यांनी केला आहे.

राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कमालीचे नुकसान झाले आहे. सरकार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देत असली तरी संपूर्ण कर्जमाफी व्हावी अशी मागणी सातत्याने केली जात आहे. त्यावर बोलताना शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकार किती वेळ करत राहणार, असा प्रश्न विचारला होता. त्यावर आंबेडकरांनी टीका केली आहे. शेतकरी अवकाळी पावसामुळे, पिकांच्या नुकसानीमुळे आणि शेतमालाला योग्य भाव न मिळाल्यामुळे मोठय़ा अडचणीत आहेत. अवकाळी पावसाने राज्यातील 29 जिह्यांतील 68 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सरकारने मदत जाहीर केली असली तरी एक पैसाही शेतकऱ्यांच्या हातात पोहोचलेला नाही. शेतकऱ्यांनी दिवाळी अंधारात घालवली आणि त्यांच्या आशाही पावसात वाहून गेल्या.