
मतांसाठी वाटेल ते हेच भाजपचे धोरण असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. आंध्रप्रदेशातील एक कोटी लोकांनी भाजपला मतदान केल्यास 200 रुपयांची दारूची बाटली 50 रुपयांना देऊ, अशी विचित्र ऑफरच प्रदेशाध्यक्ष सोमू वीरराजू यांनी दिली आहे.
पक्षाच्या जाहीर सभेत वीरराजू यांनी हे आश्वासन दिले आहे. राज्य सरकारकडून जनतेला निकृष्ट दर्जाची दारू चढय़ा दराने उपलब्ध करून दिली जाते. तर दर्जेदार दारूची एक बाटली 200 रुपयांवर विकली जाते. आंध्रात दारूचे बनावट ब्रँड विकले जातात. चांगली आणि लोकप्रिय दारू मिळत नाही, असे वीरराजू यांनी सांगितले.
राज्यातील एक कोटी लोक दारूचे सेवन करतात. प्रत्येक व्यक्ती दारूवर महिन्याला 12 हजार रुपये खर्च करते. 2024च्या निवडणुकीत एक कोटी लोकांनी भाजपला मतदान करावे. चांगली दर्जेदार दारू 75 रुपये प्रति बाटली देऊ आणि महसूल उरल्यास 50 रुपयांनाही बाटली मिळेल, अशी जगावेगळी ऑफर वीरराजू यांनी मतदारांना दिली.



























































