
सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा
२१ जून हा दिवस संपूर्ण जगात “जागतिक योग दिवस” म्हणून साजरा केला जातो. उरण तालुक्यात विविध ठिकाणी गुरुवार दि. २१ जून ‘योग दिवस’ अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला.
फुंडे हायस्कूल येथे ज्येष्ठ विज्ञान शिक्षिका साधना पाटील यांनी विद्यार्थ्यांना योगासनाचे महत्व सांगितले. तसेच काही योग प्रकारांचे प्रात्यक्षिक करून दाखविले. त्यानंतर गुरुकुल प्रमुख आणि योगगुरु आर. एल. प्रक्षाले यांनी देखील योगासनांचे प्रात्यक्षिक केले आणि सर्व विद्यार्थ्यांकडून करून घेतले. जायंटस् ग्रुप आँफ उरण ने उरण नगरपरिषदची शाळा नानासाहेब धर्माधिकारी शाळा क्रमांक ३ येथे योगासनांची प्रात्यक्षिके मुला -मुलींना दाखवुन त्यांच्याकडून योगासने करून घेतले.
तालुक्यातील प्रत्येक शाळांमध्ये यावेळी योग प्रात्याक्षिके मुलांना करून दाखविण्यात आली. उरण पंचायत समिती कार्यालयात देखिल योगाचे धडे देण्यात आले. यावेळी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी योग प्रात्यक्षिके केली. फुंडे हायस्कूल मध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका रत्ना गवळी व सहशिक्षकही उपस्थित होते. तर उरण शाळेत जायंटस् ग्रुप ऑफ उरणच्या माजी अध्यक्षा तथा नगरसेविका वर्षा अरुण पाठारे, पीआरओ शिल्पा शेडगे व जयंटस ग्रुप ऑफ उरणच्या अध्यक्षा दक्षता पराडकर, सदस्या संगीता ढेरे यांनी जायंटस् ग्रुप आँफ उरणतर्फे सर्व मुला-मुलींना डेअरी मिल्क चॉकलेट व शिक्षकांना डाबरचे मध वाटप करण्यात आले.




























































