आणि अमिताभ शांतपणे कार चालकाची वाट बघत थांबले…

571

गोव्यातील 15 व्या आणि देशातील 50 व्या अर्थात सुवर्णमहोत्सवी इफ्फीच्या उद्धाटन सोहळ्यात करियर मधील पहिल्या सिनेमाचे चित्रीकरण गोव्यात झाल्याने गोवा आपल्यासाठी खास असल्याचे सांगत सदैव रसिक प्रेक्षकांच्या ऋणात रहायला आवडेल असे अदबीने सांगत उपस्थितांची मने जिंकलेल्या बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांनी महानायक असून देखील आपले पाय अजुन देखील जमीनीवर असल्याचा प्रत्यय गुरुवारी दिला.

सुवर्णमहोत्सवी इफ्फीचे औचित्य साधून  चित्रपट सृष्टीमधील प्रतिष्ठित असा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्यानेअमिताभ बच्चन यांचे गाजलेले निवडक चित्रपट दादासाहेब फाळके रेट्रोस्पेक्टिव विभागात दाखवले जात आहेत. गुरुवारी ‘पा’ सिनेमाने या विभागाचे उद्धाटन झाले. त्याला दस्तूरखुद्द अमिताभ बच्चन यांनी हजेरी लावली.

या विभागाच्या उद्धाटन सोहळ्याला अमिताभ बच्चन उपस्थित राहणार याची कल्पना बुधवार पर्यंत कोणाला नव्हती. सकाळी 10 वाजता उद्धाटन आणि साडे नऊ वाजता पिआयबीचा एसएमएस आला त्यात  साक्षात बिग बी या विभागाचे उद्धाटन करणार असल्याचे कळवण्यात आले आणि सगळ्याच्या नजरा त्यांच्या आगमनाकडे लागल्या. बघता बघता कला अकादमी मधील रेड कार्पेट गजबजून गेला. पत्रकार,छायाचित्रकार यांनी रेड कार्पेटला वेढा घातला.

अमिताभ यायच्या पूर्वी 5 मिनिट आधी मुख्यमंत्री प्रमोद सावंत आले. मुख्य सचिव परिमल राय, गोवा मनोरजंन संस्थेचे सीईओ अमित सतेजा, महोत्सव संचालक चैतन्य प्रकाश आणि त्यांची टीम बच्चन यांच्या स्वागतासाठी सज्ज झाली.

एस्कोर्टचा सायरन वाजला आणि पांढऱ्या रंगाच्या बीएमडब्ल्यू मधून बच्चन उतरले. उतरताच हात जोडून हसतमुखाने सगळ्याना अदबीने नमस्कार केल्या नंतर त्यांनी रेड कार्पेट वरुन खास अंदाजात कला अकादमी मधील व्हीआयपी लाउंजकडे प्रयाण केले. वाटेत फोटोग्राफर्सनी त्यांना थांबून पोज देण्याची विनंती केली. कोणतेही आढेवेढे न घेता अगदी शांतपणे त्यांची विनंती मान्य करत त्यांना पोज देऊन बच्चन पुढे निघाले. वाटेत त्यांचे चाहते त्यांना हाय, हेलो करत होते, त्याला बच्चन तेवढयाच नम्रपणे प्रतिसाद देत होते.

कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर सभागृहात दादासाहेब फाळके रेट्रोस्पेक्टिव विभागात दाखवल्या जाणाऱ्या आपल्याच सिनेमांच्या विभागाच्या उद्धाटनाला बच्चन यांनी स्वतः हजेरी लावत या विभागाला ग्लॅमर प्राप्त करून दिले.

कालच्या प्रमाणे आज देखील बच्चन यांनी गोवा आपल्यासाठी खास असल्याचे सांगत आपला सन्मान केल्या बद्दल आभार मानले.बच्चन यांनी उद्धाटनाचा सिनेमा असलेल्या पा सिनेमाच्या आठवणींना उजाळा दिला.

उद्धाटन सोहळा आटोपून बच्चन रेड कार्पेट वरुन पुन्हा कला अकादमीच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर उभ्या असलेल्या कारपाशी पोचले तेव्हा कार मध्ये चालकच नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

खरे तर बच्चन हे महानायक आहेत तसे ते महान व्यक्तिमत्व देखील आहे.कडक उन्हात देखील सूटा बूटात असलेले बच्चन शांतपणे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि इतरांशी गप्पा मारत उभे राहिले.चार ते पाच मिनिटे बच्चन ताटकळत कारपाशी उभे होते. शेवटी कुठे तरी गायब झालेला चालक धावत पळत हजर आला आणि बच्चन यांची कार आल्या मार्गाने परतीच्या प्रवासाला निघुन गेली.

बच्चन यांच्या जागी दूसरा तिसरा कोणी असता तर त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली असती. कडक उन आणि सूट बूट यामुळे एरव्ही कोणासाठीही ताटकळत थांबणे कठीण झाले असते मात्र सुपरकुल बच्चन यांनी मात्र आपण महानायक असलो तरी आपले  पाय आज देखील जमिनीवर असल्याचे दाखवून दिले आहेत. आयोजकांनी त्या चालकाचा कसा समाचार घेतला हे मात्र समजू शकले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या