गोवा चॅलेंजर्सने जेतेपद पटकावले; गतविजेत्या चेन्नई लायन्सवर 8-7 असा रोमहर्षक विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोवा चॅलेंजर्स संघाने किताबी लढतीत गतविजेत्या चेन्नई लायन्सवर 8-7 असा थरारक विजय मिळवत अल्टिमेट टेबल टेनिस स्पर्धेतील चौथ्या हंगामाचे विजेतेपद पटकावले. हिंदुस्थानचा आघाडीचा टेबल टेनिसपटू हरमीत देसाई आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील पदकविजेता अलव्हारो रॉब्लेस हे या जेतेपदाचे शिल्पकार ठरले.

हिंदुस्थानचा आघाडीचा खेळाडू हरमीत देसाईने पुरुष एकेरीच्या पहिल्या लढतीत 2-1 अशा फरकाने बेनेडिक्ट डुडाचा पराभव करून गोवा चॅलेंजर्सला दमदार सुरुवात करून दिली. जागतिक क्रमवारीत 32व्या स्थानावर असलेल्या डुडा हा आतापर्यंत सीझन 4 मध्ये अपराजित राहिला होता आणि त्याने हरमीतविरुद्ध त्याच दर्जाचा खेळ केला. डुडाने पहिला गेम 11-6 असा जिंकला, परंतु हरमीतने जबरदस्त पुनरागमन केले आणि दुसरा गेम 11-4 असा जिंकून सामना निर्णायक गेममध्ये नेला. दोन्ही खेळाडूंनी जोरदार खेळ करून प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली, परंतु अखेर हरमीतने 11-8 अशी बाजी मारली.

लीगमध्ये 200 गुणांची कमाई करणारी पहिली महिला खेळाडू यांग्झी लियूने यूटीटीच्या चौथ्या हंगामातही अपराजित मालिका कायम राखली आणि सुथासिनी सवेत्ताबटवर 2-1 असा विजय मिळवून चेन्नई लायन्सचे आव्हान कायम राखले. मिश्र दुहेरीत अचंता शरत कमल-यांग्झी या जोडीने 2-1 अशा फरकाने हरमीत-सुथासिनी यांचा पराभव करून चेन्नई लायन्सला 5-4 अशी आघाडी मिळवून दिली.