
पणजीतून उत्पल पर्रीकर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत उभे राहिल्यास त्यांच्याविरोधात उमेदवार देणार नाही हा शिवसेनेने दिलेला शब्द आज पाळला. उत्पल पर्रीकर यांचा अर्ज वैध ठरताच शिवसेनेचे पणजीतील उमेदवार शैलेंद्र वेलिंगकर यांनी उमेदवारी मागे घेतली. शिवसेनेचा उत्पल पर्रीकर यांना पूर्ण पाठिंबा असेल, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना भाजपने पणजीतून उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी उत्पल पर्रीकर म्हणाले होते, ‘मला माझ्या वडिलांचे काम पुढे न्यायचे आहे. मी पणजीतल्या लोकांसाठी 200 टक्के देऊन काम करीन. ते मला पाठिंबा देतील याची मला खात्री आहे. निवडणूक जिंकण्याविषयीच्या विश्वासाबद्दल विचारणा केली असता पर्रीकर म्हणाले, पणजीच्या लोकांचा मला पाठिंबा आहे. पणजीच्या भविष्यासाठी ते मला नक्कीच मतं देतील. उत्पल पर्रीकर यांच्या या निर्णयाचे स्वागत करताना शिवसेना आपला उमेदवारी अर्ज मागे घेईल, असे आश्वासन खासदार संजय राऊत यांनी दिले होते. त्यानुसार आज शिवसेनेचे उमेदवार शैलेंद्र वेलिंगकर यांनी अर्ज मागे घेतला.
हे गोव्याच्या राजकारणाचे शुद्धीकरण
‘आम्ही आमचा शब्द पाळत आहोत. शिवसेनेचे शैलेंद्र वेलिंगकर यांनी पणजीमधून उमेदवारी मागे घेतली आहे. इतकेच नाही, तर आमचे कार्यकर्ते उत्पल पर्रीकर यांना पूर्ण पाठिंबा देतील. पणजीची लढाई ही केवळ निवडणुकीपुरती आहे पण हे गोव्याच्या राजकारणाचे शुद्धीकरणही आहे, असे आमचे मत आहे,’ असे ट्विट शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे.
































































