
सामना प्रतिनिधी । पणजी
नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्या कार्यालयात दाखल होणारे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे आम्ही खुल्या दिलाने स्वागत करतो. परंतु त्याचवेळी संपूर्ण मंत्रिमंडळाने झोपेतून जागे होऊन राज्याच्या कल्याणासाठी नव्या वर्षात कटिबद्ध व्हावे, अशी अपेक्षा गोवा शिवसेनेने व्यक्त केली आहे. या संदर्भात प्रसिद्धीला दिलेल्या एका पत्रकात गोवा शिवसेनेच्या उपाध्यक्ष तथा प्रवक्या राखी प्रभुदेसाई नाईक यांनी म्हटले आहे, की गोव्यातील समस्या सोडवण्यात राज्याचे अकार्यक्षम मंत्री अपयशी ठरले आहेत. पर्रिकर यांच्याकडून त्यांनी स्फूर्ती घेतली पाहिजे.
खाण उद्योगापुढे निर्माण झालेला पेचप्रसंग सरकारने सोडवावा अशी शिवसेनेची अपेक्षा आहे, असे नाईक म्हणाल्या. खाण उद्योग पूर्ववत सुरू व्हावा अशी गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. केंद्र सरकार यावर तोडगा काढील या आशेवर खाणग्रस्त बसून आहेत. राज्याच्या मंत्र्यांनीही त्यासाठी सर्व ते प्रयत्न करावयास हवेत. मत्स्य व्यवसायाबद्दल असलेला संभ्रम कायमचा दूर केला पाहिजे. गोव्याच्या मासळी बाजारांमधे विकले जाणारे मासे फॉर्मेलिनमुक्त असतील, यासाठी सरकारने आवश्यक पावले उचलण्याची गरज आहे. गोव्यात बाहेरून येणाऱ्या माशांची तपासणी करण्यासाठी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी बाजारांमधे कोणती यंत्रणा कार्यान्वित केली आहे, हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
पर्यटन व्यवसायात पैसे गुंतवलेल्या लोकांची पर्टनमंत्री मनोहर आजगावकर त्वरित भेट घेऊन त्यांच्या समस्या समजावून घेतील, अशी आम्ही अपेक्षा करतो. आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी गोव्याच्या किनाऱ्यांकडे का पाठ फिरविली आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतानाच गोवा हे अधिक खर्चिक ठिकाण बनू नये यासाठी काय करता येईल हेही पाहिले जावे,असा सल्ला नाईक यांनी दिला आहे. केवळ मुख्यमंत्री पुन्हा परतले म्हणून उत्साह दाखवणे पुरेसे नाही. मंत्र्यांनी शक्य तेवढे आपापल्या कामांना जुंपून घेतले पाहिजे, असे त्या म्हणाल्या. मानवी हक्कांचा मान राखणारे आणि निरपराधांना पोलीस कोठडीत मारहाण करणे थांबवणारे भ्रष्टाचारमुक्त पोलिस दल नव्या वर्षात पाहावयास मिळेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.


























































