मूसळधार पावसामुळे गोव्यात जन जीवन विस्कळीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, गोवा

काल रात्री पासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे गोव्यातील जन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. नद्या, नाले तूडूंब भरून वाहत आहेत. शहरातील रस्त्यांना नद्याचे स्वरूप आले असून त्यामुळे वाहतूक सेवा प्रभावित झाली आहे. सखल भागातील घरांमध्ये पाणी गेल्यामूळे लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राजधानी पणजी तर आज पाणीजी बनली होती. स्मार्ट सिटी असलेल्या पणजी मध्ये बहुतेक सगळे रस्ते जलमय झाले होते. पाण्याचा निचरा होण्याची योग्य ती व्यवस्था नसल्याने सगळ्या ठिकाणी ढोपर भर पाणी साचले होते. स्मार्ट सिटी पावसाचा सामना करण्यास सक्षम नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या मतदारसंघातही लोकांना पावसात जगणे कठीण झाले आहे.

डिचोली, साखळी भागात सुद्धा पुरसदृष्य स्थिती आहे. वाळवंटी नदिला आलेल्या पुराचे पाणी पंप लावून उपसुन काढले जात आहे. पणजी शेजारील कामराभाट परिसरात अनेक घरात पाणी शिरुन मोठे नुकसान झाले. सांतिनेज खाड़ीची स्वच्छता न झाल्याने ही खाडी दुथडी भरून वाहत होती, तर अनेक ठिकाणी झाडे कोसळून नुकसान झाले आहे. काही ठिकाणी रस्ते खचले असल्याचे दिसून आले.