गोव्यात मुसळधार पाऊस कायम; जनजीवन विस्कळीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोव्यात पावसाची मुसळधार कायम रहिल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. नदी,नाल्यांना पूर आल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. डिचोलीतील नार्वे व वेळगे येथील दोन घरे कोसळली. सुमारे अडीच लाखांची हानी झाली आहे. कोने, प्रियोळ येथील मुख्य रस्त्यावर दरड कोसळल्याने पणजी – फोंडा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

पावसाचा जोर कमी होत नसल्याने शाळांना सुट्टी द्यावी, अशी मागणी एनएसयूआय आणि गोवा फॉरवर्डच्या युवक विभागातर्फे करण्यात आली आहे. मागच्या वर्षीपेक्षा यंदा 13 टक्के जास्त पाऊस पडल्याची आकडेवारी समोर आली आहे. 1 जून ते 5 जुलै दरम्यान राज्यात एकूण 47.36 इंच पावसाची नोंद झाली आहे.

हा पाऊस गेल्यावर्षी याच काळात पडलेल्या पावसापेक्षा सरासरी 13 टक्क्यांनी जास्त आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 5 ते 9 जुलै दरम्यान गोव्यात अति मुसळधार पावसाची शक्यता गोवा हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच मच्छिमारांना 5 दिवस समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुसळधार पावसामुळे खारेबांध येथील तळे काठोकाठ भरले आहे. याच परिसरात सुरू असलेल्या वेस्टर्न बायपासच्या कामांमुळे पुराचा धोका वाढला आहे. आधीच दक्षिण गोव्यात पावसामुळे पूरस्थिती दिसून येत आहे, त्यातच खारेबांध तळे भरल्यामुळे बाणावलीच्या आमदारांसह पर्यावरणप्रेमींतून चिंता व्यक्त केली आहे. दक्षिण गोव्यातही मुसळधार पावसाने दाणादाण उडाली असून दरवर्षीप्रमाणे गुडी पारोडा रस्ता पाण्याखाली गेला आहे. पारोडा येथील पुलावरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक बंद झाली आहे.

केपे ते मडगाव हा मुख्य रस्ता पर्वत पारोडा येथे पाण्याखाली गेल्याने या रस्त्यावरील संपूर्ण वाहतूक चांदर मार्गे वळविण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी 11 वाजता पारोडा येथे रस्ता पाण्याखाली गेला, तसेच पारोडा येथील कुशावती नदीवरील पूलही पाण्याखाली गेल्याने तो रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे.