
सामना प्रतिनिधी। पणजी
आजारपणामुळे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची सरकारवरील पकड ढिली पडू लागली आहे. त्यातच मंत्रिमंडळामध्ये समावेश न झाल्याने नाराज असलेल्या उपसभापती मायकल लोबो यांनी शुक्रवारी दिवसभरात केलेल्या शाब्दीक हल्ल्याने अनेक भाजप नेते घायाळ झाले आहेत. यामुळे दिल्ली येथे उपचार घेत असलेल्या मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी लोबो यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेतली असून नाराजी दूर करण्यासाठी त्यांना दिल्लीला बोलावले आहे. अशी चर्चा आहे.
शुक्रवारी दिवसभरात दोनवेळा मायकल लोबो यांनी सरकार व भाजप नेत्यांवर तोफ डागल्याने भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर आयुष मंत्री श्रीपाद नाईक व खासदार नरेंद्र सावईकर यांच्यावर केलेली जाहीर टिका भाजप नेत्यांच्या जिव्हारी लागली आहे. लोकसभा निवडणुका जवळ आल्या असताना खाण अवलंबितांना भडकावणारे भाषण करून भाजपला अडचणीत आणल्यामुळे भाजप नेत्यांमध्ये लोबों विरोधात संतापाची लाट उसळली आहे.
शुक्रवारी आझाद मैदानावर लोबो यांनी केलेल्या भाषणाची व्हिडिओ लिंक पर्रीकर यांना पाठवण्यात आली आहे. त्याचबरोबर लोबो यांनी दिवसभरात सरकार व भाजप नेत्याविरोधात केलेल्या विधानाबाबत केंद्रीय नेत्यांना माहिती देण्यात आली आहे. लोबो यांनी मुख्यमंत्री व दोन्ही खासदारांनाच टार्गेट केल्याने भाजपची चांगलीच गोची झाली आहे. भाजप गाभा समितीमध्येही याबाबत चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्यातील खाण व्यवसाय सुरु झाला नाही तर भाजपच्या दोन्ही खासदारांना पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. एवढेच नव्हे तर लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी उमेदवारी अर्जही भरू नयेत, असे स्पष्ट करीत लोबो यांनी खाण अवलंबितांच्या आंदोलनात भाजपचे खासदार व केंद्रीय मंत्री नाईक व सावईकर यांच्यांवर टीका केली होती. आपण पूर्णपणे खाण अवलंबितांच्या पाठिशी असून खाण प्रश्न सुटला नाही तर प्रसंगी राजीनामा देण्यास तयार असल्याचेही सांगून भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते.


























































