
नरकासुराचे दहन करून दीपोत्सव साजरा करण्याची प्रथा गोव्यात शेकडो वर्षे सुरु आहे. दीपावलीला जेमतेम एक महिना उरला असल्याने राज्यात नरकासूर बनवण्याची तयारी सुरू झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. उत्तर हिंदुस्थानात दसऱ्यावेळी रावणाचे दहन करण्याची प्रथा आहे. गोव्यात दसरा पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. दसऱ्याच्या दिवशी रावण दहन करण्याची प्रथा गोव्यात नसली तरी नरकचतुर्दशीच्या पहाटे नरकासुराचे दहन झाल्यानंतर अभ्यंगस्नान करून दीपावली साजरी करण्याची प्रथा आहे.
गोव्यात गल्लो गल्ली उभरलेले नरकासूर पहायला मिळतात. नरकचतुर्दशीच्या रात्री हे नरकासूर बनवून लोकांना पाहण्यासाठी ठेवले जातात. रात्रभर लोक नरकासूर बघण्यासाठी आसपासच्या परिसरात फिरत असतात. यंदा देखील अगदी एक फूटापासून 100 फूटापर्यंतचे नरकासूर बनवण्याची तयारी सुरु झाली आहे.

पणजी येथील स्पार्कलिंग स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लबने नरकासूर बनवण्यास सुरुवात केली आहे. क्लबचा अध्यक्ष शुभम प्रभू म्हणाला, दीवाळीला एक महिना असताना नरकासूर बनवण्याचे काम सुरु करावे लागते. नरकासूर बनवणारे कोणी नोकरी करतात तर कोणी शाळा, कॉलेजमध्ये जातात. त्यामुळे रात्री उशिराच सगळे एकत्र येतात.वेळ कमी मिळत असल्याने महीनाभर अगोदर सुरुवात करावी लागते.

नरकासूर बनवायला सुरुवात करताना त्याचा मुखवटा तयार करण महत्वाचे असते. आमच्या क्लबचा सन्नी उसगावकर हा मुखवटा बनवण्यात माहीर आहे. बाकीचे सदस्य त्याला माती आणून देणे आणि इतर स्वरूपाची मदत करतात. सध्या आम्ही मातीचा मुखवटा करत आहोत.नंतर त्यावर प्लास्टर ऑफ पॅरिस टाकून मुख्य मुखवटा तयार केला जाणार आहे.गेल्या वर्षी आमच्या क्लबचा नरकासूर सर्वोत्कृष्ठ ठरला होता. यंदा देखील आमच्या क्लबचा नरकासूर आगळा वेगळा असणार आहे. नरकासूर बनवायला साधारणपणे 80 ते 90 हजार रुपये खर्च येतो, असेही शूभम म्हणाला.


























































